माजलगाव धरणाची १ मीटरने वाढली पाणीपातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:22 PM2019-09-24T18:22:53+5:302019-09-24T18:30:08+5:30
मृतसाठ्याबाहेर येण्यासाठी दोन फुट पाण्याची आवश्यकता
माजलगाव : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बीड, वडवणी व शिरूर कासार परिसरात सोमवारी झालेल्या अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणावर पाण्याची आवक व्होउन पाणी पातळी १ मीटरने वाढली आहे. तरीही धरण मृतसाठ्यातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ 2 फुट अंतर राहिले आहे.
माजलगाव धरण पावसाळा संपत आला असतांना ही मृतसाठ्यातच होता. यावर्षी धरण भरेल ही आशाच शेतकर्यासह सर्वसामान्यांनी सोडली होती. मात्र परतीच्या पावसावर निदान मृतसाठ्याच्यावर पाणी पातळी वाढेल ही आशा होती. सोमवार दि.23 रोजी माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बीड, वडवणी व शिरूर कासारसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे. या पडलेल्या पावसामुळे 12 तासात माजलगाव धरणाची पाणी पातळी 1 मिटरने वाढली असून आत्ता मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 2 फुट अंतर राहिले आहे.
मंगळवारी दुपारी 2 वाजे दरम्यान धरणाची पाणी पातळी 425.38 मिटर झाली असून मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी 426.11 मिटर पाणी पातळी आवश्यकता आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मिटर एवढे पाणी लागते. तर आणखी धरण शंभर टक्के भरण्यासाठी 6.42 मिटर एवढी पाणी पातळी वाढणे आवश्यक आहे. सध्या धरणाची पाणी पातळी मृतसाठ्यात असून 120.40 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी 6.92 टक्के खालावलेलीच आहे. सध्याचे परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने व हवामान खात्याने परतीचा पाऊस मुसळधार असल्याचा अंदाज सांगीतला आहे. त्यामुळे निश्चितच माजलगाव धरण भरेल अशी आशा शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांना लागली आहे. यापूर्वी माजलगाव धरण अनेक वेळा परतीच्या पावसाने दोन-तीन दिवसात भरल्याले आहे.