बीड : अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूतीगृहात दोन तोंडाच्या बाळाचा जन्म, डॉ. संजय बनसोडेंनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 10:39 AM2017-10-30T10:39:27+5:302017-10-30T11:04:34+5:30
अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला.
बीड - अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाच्या प्रसूती विभागात रविवारी (29 ऑक्टोबर ) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाला. या विभागातील प्रख्यात सर्जन व सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत. बाळाच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिच्यावर उपचार करताना व तिची पूर्वीची कागदपत्रं तपासताना तिच्या पोटातील बाळ अॅबनॉर्मल आहे हे लक्षात आल्यानंतर सर्व दक्षता घेतल्या. डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलेचे सीझर केले व बाळाचा जन्म झाला. दरम्यान जन्माला आलेल्या बाळाला दोन तोंडे होते. या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम असून बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या चांगली आहे. सध्या बाळावर शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
याच वैद्यकीय महाविद्यालयात २०१४ साली एका महिलेने सातव्या महिन्यात दोन तोंडे असलेल्या बाळाला जन्म दिला होता. मात्र त्या बाळाचा जन्मानंतर मृत्यू झाला होता. या बाळांच्या आयुष्याबद्दल खात्रीशीर काहीही सांगता येत नसले तरी बाळं अनेकवर्षे जगत असल्याचीही अनेक उदाहरणे वैद्यकीय शास्त्र अभ्यासात आढळून आले असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
दरम्यान, या बाळाच्या आईला यापूर्वी तीन मुली आणि एक मुलगा असून हे पाचवे अपत्य असून बाळाच्या आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले. डॉ. संजय बनसोडे हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूतीवास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करू लागल्यानंतर अनेक अवघड शस्त्रक्रिया करुन त्यांनी अनेक महिलांचे व बाळांचे प्राण वाचवले आहेत.
एवढेच नव्हे तर अवघड शस्त्रक्रियांचे देशपातळीवर विक्रम केले असून वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि प्रसूती विभागाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर स्पष्टपणे उमटवले आहे. डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या अलौकिक कार्याचे कौतुक डीन डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. शैलैष वैद्य यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी केले आहे.