दोन डोक्यांचे बाळ २४ तासांतच दगावले, बीडमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:50 AM2017-10-31T01:50:16+5:302017-10-31T01:50:29+5:30
अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिलेने रविवारी रात्री एक शरीर आणि दोन डोक्यांच्या मुलाला जन्म दिला. शिशू अतिदक्षता विभागात या बाळाला ठेवण्यात आले होते; परंतु २४ तासांतच हे बाळ दगावले.
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिलेने रविवारी रात्री एक शरीर आणि दोन डोक्यांच्या मुलाला जन्म दिला. शिशू अतिदक्षता विभागात या बाळाला ठेवण्यात आले होते; परंतु २४ तासांतच हे बाळ दगावले.
येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळांतपणासाठी दाखल झाली होती. पूर्वीची कागदपत्रे तपासताना तिच्या पोटातील बाळ ‘अॅबनॉर्मल’ आहे, हे लक्षात आल्यानंतर सर्व दक्षता घेत प्रसुतीशास्त्र विभागातील प्रख्यात सर्जन तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाºयांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली.
या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रॅम होते. त्याचे दोन्ही मेंदू कार्यरत होते. परंतु सोमवारी रात्री ८.३०
वाजता त्याची प्रकृती बिघडली. डॉ. बनसोडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या बाळास वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यास यश आले नाही.
डॉक्टरांनी हे बाळ वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती; मात्र पालकांची मानसिकता अनुकूल नसल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करून मुलाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
बाळाच्या आईला तीन मुली आणि एक मुलगा असून हे पाचवे अपत्य होते. बाळाच्या आईची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
२0१४ ची पुनरावृत्ती
या ‘अबनॉर्मल’ बाळाला दोन डोके, दोन किडणी आणि दोन फुफुसे असली तरी इतर सर्व अवयव एक -एकच होते. या वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी २०१४ साली एका महिलेने अशाच एका ‘अबनॉर्मल’ बाळाला जन्म दिला होता. मात्र ते बाळ लगेच मृत पावले होते.