बीडमध्ये दोनशे हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा वाळल्या; केळी, आंब्याच्या बागांत तीच परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:35 AM2019-05-12T04:35:47+5:302019-05-12T04:36:02+5:30
आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली.
- दीपक नाईकवाडे
केज (जि. बीड) : बारा वर्षांपूर्वी लागवड करून जोपासलेल्या डाळिंबाच्या दोनशे हेक्टर क्षेत्रातील बागा यावर्षीच्या दुष्काळाने वाळून गेल्याने उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी व आंब्याच्या बागांची अशीच परिस्थिती झाली आहे.
उंदरी येथे २००८ पासून येथील शंभरावर शेतकऱ्यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करण्यास सुरुवात केली. डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनासाठी उंदरचे नाव महाराष्ट्रात झाले. त्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रोत्साहन दिले.
दुष्काळाने विहिरीसह बोअरवेल व शेततळ्यातील पाणी आटल्याने शेजारच्या शेतकºयांकडून एक हजार रुपये तासाने पाणी घेतले. मात्र पाणी कमी पडल्याने केळीची बाग ऐन भरात वाळून गेली, असे उत्तम ठोंबरे यांनी सांगितले.
आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली. एक एकरात आंबा व शेवगा लावला. डाळिंबास कळी लागून माल धरण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने डाळिंबासह आंबा व शेवगा वाळून गेला, अशी व्यथा मधुकर ठोंबरे यांनी मांडली.
दोन एकर बाग टँकरवर
दहा एकरात २००८ मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. २००८ मध्ये शेततळे घेतले. चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. दुष्काळाने १० एकरची डाळिंबाची बाग दोन एकरवर आल्याने पंचवीस लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन एकर बाग टँकरने पाणी आणून जगवत आहे.
- भागवत ठोंबरे, शेतकरी
तीन लाखांचा फटका
साडेचार एकर क्षेत्रापैकी दोन एकरमध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. दरवर्षी पंधरा टन उत्पादन निघत होते. यावर्षी बाग धरण्यासाठी ७० हजार रुपयांचा खर्च केला. बाग हातची गेल्याने तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच भावाच्या शेतातील एक हेक्टर क्षेत्रातील गावरान आंब्याची बाग वाळून गेली.
- नानासाहेब मोहन जाधव, शेतकरी