अंबाजोगाईत दिवसाला दोन घागरी पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:26 AM2020-12-25T04:26:45+5:302020-12-25T04:26:45+5:30
अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा ...
अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाई शहरात दहा दिवसांनी वीस घागरी पाणी सोडण्यात येते. म्हणजेच
दिवसाकाठी दोन घागरी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सामान्य नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण आणि काळविटी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. शहरात आठ ते दहा दिवसांनी एक वेळ पाणीपुरवठा केला जातो. अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करताना दिसतात. शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याचे सांगण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला. आता भरपूर पाऊस झाला. त्यामुळे जलसाठा मुबलक आहे. नगरपालिकेचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ढासळल्यामुळे आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बुधवारी येथील समर्थनगर परिसरात दहा दिवसांनंतर एक तास पाणी सोडण्यात आले. पाणीटंचाईमुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दहा दिवसांनी एक तास म्हणजे सरासरी दररोज सहा मिनिटे पाणी सोडण्यात आले. सहा मिनिटांत केवळ दोन घागरी भरतात. आता दोन घागरी पाणी दिवसभर पुरवायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. चार दिवसांनी एक वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिक करीत आहेत; परंतु नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी जाऊन नवीन मुख्याधिकारी साबळे यांनी पदभार स्वीकारला असून, नवीन मुख्याधिकारी नागरिकांची तहान भागवून मुबलक पाणी पुरवण्याची सोय करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.