विद्यार्थ्यांची नेट बँकिंगद्वारे दोन लाख ८९ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:31 AM2021-01-22T04:31:07+5:302021-01-22T04:31:07+5:30

केज : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात वडिलांनी शिक्षणासाठी टाकलेली रक्कम अज्ञात व्यक्तीने नेट बँकिंगद्वारे दोन लाख ...

Two lakh 89 thousand fraud of students through net banking | विद्यार्थ्यांची नेट बँकिंगद्वारे दोन लाख ८९ हजारांची फसवणूक

विद्यार्थ्यांची नेट बँकिंगद्वारे दोन लाख ८९ हजारांची फसवणूक

Next

केज : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात वडिलांनी शिक्षणासाठी टाकलेली रक्कम अज्ञात व्यक्तीने नेट बँकिंगद्वारे दोन लाख ८९ हजार रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्स्फर करून घेत फसवणूक केली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज शहरातील माधवनगर भागात वास्तव्यास असलेला अक्षयकुमार हनुमंत देशमुख हा पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याचे एसबीआय बँकेच्या केज शाखेत खाते (खाते क्र. ३४१६३४७०७६२) असून, या खात्यावर त्याच्या वडिलांनी शिक्षणासाठी दिलेली दोन लाख ८४ हजार ४९९ रुपयांची रक्कम टाकली होती. त्याला ६ जून २०२० रोजी मोबाईल फोन पे ॲपच्या माध्यमातून बँकेत रक्कम जमा झाल्याचा संदेश आला. त्या संदेशासोबत वेगवेगळ्या फोन नंबरच्या लिंक आल्या होत्या. या लिंकवर गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यावरून ९० हजार ७९८ रुपयांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. नंतर त्यास फोन करून समोरच्या व्यक्तीने मोबाइलवर टीम व्हीवर हे ॲप डाऊनलोड करून घेण्यास सांगितले. शिवाय नेट बँकिंग अपडेट करून देतो असे म्हणत आणखी नेट बँकिंगद्वारे एक लाख ९८ हजार २०२ रुपये ट्रान्स्फर करून घेतले. त्यानंतर अक्षयकुमार देशमुख याने ७ जून २०२० रोजी मो. नं. ७७३९१९१२२९ व ८६९७४०३५५९ या नंबरवर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने फोन पेचा एजंट असल्याचे आणि तुमचे खाते हॅक झाल्याचे असल्याचे सांगून १० जून २०२० पर्यंत तुमची खात्यावरून कपात झालेली रक्कम परत करू असे सांगितले. मात्र, आतापर्यंत नेट बँकिंगद्वारे परस्पर ट्रान्स्फर करून घेतलेली दोन लाख ८९ हजार रुपयांची रक्कम मिळाली नाही. पुन्हा सदरचे मोबाईल नंबरही बंद करण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी २० जानेवारी २०२१ रोजी अक्षयकुमार हनुमंत देशमुख या विद्यार्थ्याने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास बीड येथील सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे.

नेट बँकिंगच्या माध्यमातून फसवणूक वाढली

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत ‘गुगल पे,’ ‘फोन पे’ व इतर ॲपच्या माध्यमांतून रक्कम लंपास झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नसून, सर्व गुन्हे तपासावर आहेत. नागरिकांनी नेटवरून पैशाचे व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Two lakh 89 thousand fraud of students through net banking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.