सायबर भामट्यांकडून आणखी दोघांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:30+5:302021-08-29T04:32:30+5:30
बीड : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असून, शहरातील आणखी दोघांना सायबर भामट्यांनी दीड लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी ...
बीड : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असून, शहरातील आणखी दोघांना सायबर भामट्यांनी दीड लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी पेठ बीड व शहर ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी गुन्हे नोंद झाले.
गणेश हनुमान कपाळे (वय २०, रा. एकतानगर, पेठ बीड) हा शिक्षणासाठी पुण्यात राहत होता. २८ जून ते १३ जुलै २०२१ या दरम्यान त्यास सायबर भामट्यांनी तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल केले. तुला पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे गणेशला महागात पडले. त्यांनी विश्वास संपादन करून व्हॉटसॲपला चॅटिंग करून फोन पे व युपीआयडी क्रमांक मिळविला. त्याआधारे त्यांनी खात्यातील एक लाख ३५ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी गणेश कपाळेच्या तक्रारीवरून पेठ बीड ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसऱ्या घटनेत नितीन मदनलाल वीर (रा. शाहूनगर, बीड) यांच्या एसबीआयच्या खात्यातून एटीएमद्वारे २० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला.