बीडमधील देवडीत मजूराचा तर मादळमोहीत तरूणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 08:12 PM2019-05-13T20:12:53+5:302019-05-13T20:13:27+5:30
पैसा, जुन्या वादाचे कारण; भांडणात मार लागल्याने झाला मृत्यू
वडवणी / गेवराई (बीड ) : वडवणी तालुक्यातील देवडी येथे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या उसतोड मजूराचा तर गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे जुन्या भांडणातून एका हॉटेलचालक असलेल्या तरूणाचा खून झाला. दोन्ही घटनांमध्ये हाणामाऱ्या झाल्या होत्या. यात मृत्यू झाल्याने खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बाळु उर्फ आनंत निवृत्ती तळेकर (३१ मादळमोही ता.गेवराई) यांचे मादळमोही येथे हॉटेल आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली होती. जखमी तळेकर यांना तातडीने बीड येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, सोमवारी सकाळी मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी मृतदेह जिल्हा रूग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी गेवराई ठाण्यात भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती तळेकर याच्या फियार्दीवरून गणेश प्रताप मोटे, जगदिश भिमराव मोटे, अनिल भिमराव मोटे, शाम अनिल मोटे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ हे करीत आहेत. दरम्यान, मयत तळेकर याच्यावर गेवराई ठाण्यात मटका, विनयभंग, मारामाऱ्या सारखे जवळपास १५ गुन्हे दाखल आहेत.
मध्यस्थी करणे मजूराच्या अंगलट
वडवणी तालुक्यातील देवडी येथे दोघात पैश्याच्या वादातुन भांडण जुंपले. हे भांडण सोडविण्यासाठी गावातीलच शेख अजमोद्दीन शेख जैनोद्दिन (३५) हे मध्यस्थी म्हणून गेले. याच हाणामारीत शेख अजमोद्दिन यांच्या डोक्यात जबर मार लागला. यामुळे शेख हे जागीच ठार झाले. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले. रात्री उशिरापर्यंत वडवणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करणे सुरू होते. पोलीस उप अधीक्षक श्रीकांत डिसले, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली.