बीडमध्ये बिंदुसरा नदीवर होणार दोन नवे पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:32 AM2018-07-30T00:32:19+5:302018-07-30T00:32:51+5:30
बीड : नव्या बीड शहरातून जुन्या बीड शहराला जोडणारे बिंदुसरा नदीवर दोन नवीन पूल बनविण्यात येणार आहेत. या संदर्भात पालिकेने पर्यटन विकास मंडळाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर या दरम्यान सिमेंट क्राँकिटचा रस्ता बनविला जाणार आहे. तिन्ही कामांचा मिळून पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविल्याचे पालिका सूत्रांकडून समजते.
जुना बाजार ते कनकालेश्वर मंदिराला जोडणारा दगडी पूल हा निजामकालीन आहे. पूर आल्यानंतर या दगडी पुलावरुन पाणी वाहते. त्यामुळे रस्ता बंद होतो. परिणामी वाहतूक वळवावी लागते. याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. हाच धागा पकडून या ठिकाणी १.८५ लाख रुपये खर्चून ५० मीटर लांब, ७.५ मीटर रुंद व २० फूट उंच नवा पूल बनविला जाणार आहे. तसेच मोमीनपुरा ते खासबागला जोडण्यासाठी बिंदुसरा नदीवर १.३५ लाख रूपये खर्चून नवा पूल तयार केला जात आहे. या पुलाची उंचीही २० फूट असणार आहे.
तसेच पेठ बीड भागातील काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर असा ८०० मीटर लांब, ८ मीटर रुंद सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविला जाणार आहे. यासाठी १.८० लाख रुपये निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. हे तिन्ही प्रस्ताव नगर पालिकेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पर्यटन विकास मंडळाकडे एप्रिल महिन्यात पाठविले आहेत. दीपावलीपर्यंत या पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, बांधकाम अभियंता किरण देशमुख यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे.
मंत्रालयातून झाला पत्रव्यवहार
साधारण मार्च महिन्यात पर्यटन मंत्र्यांकडून बीड नगरपालिकेला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात एक पत्र आले. त्याप्रमाणे पालिकेत बैठक घेऊन दोन नवीन पूल व एक नवीन रस्ता तयार करण्यासंदर्भातचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात आला. या कामांना मंजुरी मिळून लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा बीडकरांना आहे.