बीडमध्ये ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी समोरासमोर भिडले!
By सोमनाथ खताळ | Published: May 18, 2023 10:06 PM2023-05-18T22:06:20+5:302023-05-18T22:07:10+5:30
महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच राडा
बीड: शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा शनिवारी बीडमध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी गेले होते. यावेळी दोन विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यात एका पदाधिकाऱ्याच्या गाडीची काचही फोडण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.
सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाची बीडमध्ये मोठी सभा होत आहे. या सभेसाठी खा.संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इतर खासदार, आमदारांची उपस्थिती राहणार आहे. त्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप व अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी संपर्कप्रमुख धोंडू पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास अंधारे यांच्यासह दोन्ही जिल्हाप्रमुख माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभास्थळी पाहणी करत होते.
याचवेळी दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. त्यातील एकाने काळ्या रंगाच्या गाडीची काचही फोडल्याची माहिती आहे. इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणे सोडविल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. या प्रकरणाची अद्यापतरी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.
दोन पदाधिकाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. दोघांनाही समज दिली आहे. हा घरगुती (पक्षांतर्गत) वाद आहे. याबाबत उगाचच जास्त अफवा पसरत असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आमची सभा ऐतिहासिकच होणार आणि सर्वच पदाधिकारी एक जिवाने काम करतील. -अनिल जगताप, जिल्हाप्रमुख, बीड.