चोर समजून बीड जिल्ह्यात दोघांना बेदम मारहाण, मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 07:20 AM2018-06-21T07:20:00+5:302018-06-21T07:20:00+5:30
मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.
बीड : मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात आली असून अनेक गावांतील मुलांना त्यांनी पळवून नेले आहे, या अफवेवर विश्वास ठेवून माजलगाव शहरात व माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जित्तू बाशु ईश्वर (४० रा.तमिळनाडू) यांच्यासह अन्य एका मतीमंद तरूणाला मारहाण झाली आहे. सध्या सोशल मीडियावरून मुले पळविणारी टोळी बीड जिल्ह्यात आल्याची अफवा पसरू लागली आहे. औरंगाबाद, परभणी, जालना नंतर आता बीडमध्येही दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे एक मतीमंद तरूण गावात फिरत असताना काही लोकांनी मुले पळविण्यासाठी आला आहे, असे समजून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नाना तौर व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बुधवारी सकाळी ११च्या सुमारास जित्तु ईश्वर याला पात्रुड येथे मारहाण केली. जित्तू हा गर्दीच्या ठिकाणी उभा होता. काही लोकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी कसलीच खात्री न करता बेदम मारहाण करून ग्रामीण ठाण्यात हजर केले. येथील पोलिसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात हलविले. त्याची भाषा समजत नसल्याने रात्री उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
गेवराईतही महिलेला चोप
गेवराई शहरातील आठवडी बाजारात एका भोळसर महिलेला मुले धरणारी समजून मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता घडली. तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही महिला मुले पकडणारी नसल्याचे तपासाअंती सिद्ध आले. तालुक्यातील अंतरवाली येथे दोन जणांना नागरिकांनी मुले पकडणारे समजून मारहाण केली होती. त्यानंतर सिरसदेवी येथे सहा ते सात मुले पळवून नेली जात असल्याच्या संशयातून जीपला नागरिकांनी अडविले होते. मात्र नंतर त्यात तथ्य आढळले नव्हते.