मासे पकडण्याच्या मोहात दोन शाळकरी मुलांचा डोहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:27 PM2020-11-07T17:27:22+5:302020-11-07T17:27:48+5:30
मासे पकडण्यासाठी गावाजवळील धानोरा शिवारातील एका पाण्याच्या डोहाकडे गेले होते.
अंबाजोगाई : मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शनिवारी (दि.०७) दुपारी घडली.
अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५, दोघेही रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) अशी त्या दोन मुलांची नावे आहेत. अनिकेत आणि रोहन हे दोघे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गावाजवळील धानोरा शिवारातील एका पाण्याच्या डोहाकडे गेले होते. मासे पकडत असताना पाय घसरल्याने दोघेही पाण्यात पडले. हे पाहून अनिकतेच्या भावाने धावत येऊन ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.
परंतु, ग्रामस्थ डोहाजवळ पोहोचेंपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी आपेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले. दरम्यान, दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे आपेगाववर शोककळा पसरली आहे.