परळी औष्णिक विद्यूत केंद्रातील दोन संच बंद; विजेची मागणी कमी असल्याने मुंबईहून आले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:54 PM2018-07-02T13:54:28+5:302018-07-02T13:56:16+5:30
परळी येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे ६ आणि ७ हे दोन संच गेल्या सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
परळी (जि. बीड) : परळी येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे ६ आणि ७ हे दोन संच गेल्या सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आले असून केवळ एकच संच (क्र.८) चालु आहे. या संचातून शनिवारी सायंकाळी १४० मेगावॅट एवढी वीज निर्मिती चालू होती. राज्यात विजेची मागणी कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीच्या मूंबई कार्यालयातुन संच बंद ठेवण्याच्या सुचना दिल्याने मुख्य अभियंत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे ३,४,५, हे तीन संच मागील चार वर्षापासून बंद आहेत. संच बंदमुळे येथील जुन्या वीज केंद्रातील अधिकारी, कर्मचारी विदभार्तील व नाशिकातील औष्णिक विद्युत केंद्रात पाठविले आहेत. तसेच विद्युत केंद्रात रोजंदारीने काम करणाऱ्या कामगारांच्याही हाताला काम उपलब्ध नाही. कंत्राटी कामगारही परळीतून पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे स्थलांतरीत झाले आहेत. दाउतपुर येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक ६,७,८, हे तीन संच सुरू होते. यापैकी दोन संच २४ जूनपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
पावसाळयात मागणी कमी होते
विजेची मागणी पावसाळयात कमी होते. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयानुसार परळीचे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्रमांक ८ हा सुरू असून यातून विजनिर्मिती सुरू आहे.
- विठ्ठल खटारे
मुख्य अभियंता, औष्णिक विद्यूत केंद्र, परळी