ऊसतोड कामगारांच्या दोन चिमुकल्यांचा उकळत्या पाण्याने भाजून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 12:25 PM2017-12-31T12:25:29+5:302017-12-31T12:25:40+5:30
माजलगाव (बीड) : शहरातील बंजारानगर भागात राहणा-या विजय जाधव याच्या घरी अंघोळीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळत्या पाण्याचे भांडे पडल्यामुळे यात विजय याच्या वैभव वय 3 वर्षे आणि वैष्णव वय 5 वर्ष या दोन चिमुकल्यांचा होरपळुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,विजय जाधव हा उसतोड कामगार असून तो व त्याची पत्नी हे ऊसतोडीसाठी गेलेले होते. त्याची दोन मुले वैभव व वैष्णव ही आजी-आजोबांसोबत माजलगाव शहरातील बंजारानगर भागात राहतात. 29 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलांच्या आजीने आंघोळीसाठी पाणी ठेवले होते. झोपडीवजा घर असल्यामुळे त्याच्या बाजूलाच तीन ते चार फुटांच्या अंतरावर हे दोन चिमुकले झोपलेले होते. पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले उकळते भांडे हे अचानक कळवंडल्यामुळे उकळते पाणी या दोन्ही मुलांच्या अंगावर पडले आणि ते यात चांगलेच होरपळले. घटना घडल्यानंतर आजी आजोबांनी एकच आरडाओरडा केला, त्यानंतर सदर मुलांना दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु दोन्ही मुलांच्या अंगावरील कातडी गरम पाण्यामुळे पार सोलून निघाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लातूर येथे रुग्णालयात नेण्यात आले. येथेच उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा करुण अंत झाला.
अठराविश्व दारिद्र्य असलेल्या वैभव आणि वैष्णव यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यातच त्यांच्या दोन्ही मुलांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कठीण परिस्थितीत जीवन जगणा-या जाधव याच्यावर कोसळलेल्या या दुःखामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
परिवाराला आर्थिक मदतीची गरज
अत्यंत तुटपुंज्या उत्पन्नावर विजय हा आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असे. त्यातच दोन मुलांचा करुण अंत झाल्यामुळे आता त्या मुलांच्या उत्तर कार्यासाठी देखील विजयला मोठा आर्थिक संघर्ष करावा लागणार आहे. आता या परिवाराला समाजातील सेवाभावी लोकांनी तसेच दानशूरांनी पुढे येऊन मदत केली, तरच त्याचा तात्पुरता चरितार्थ पुढे चालू शकतो.