दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:05+5:302021-09-09T04:41:05+5:30

बीड : कर्तव्य बजावताना अपघात झाल्याने प्राण गमावलेल्या महामार्ग विभागाच्या पोलिसाच्या कुटुंबासाठी राज्यभरातील पोलिसांनी मदतीचा हात दिला. ...

Two tears of sorrow for a man ... | दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...

दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...

Next

बीड : कर्तव्य बजावताना अपघात झाल्याने प्राण गमावलेल्या महामार्ग विभागाच्या पोलिसाच्या कुटुंबासाठी राज्यभरातील पोलिसांनी मदतीचा हात दिला. सुमारे १३ लाख रुपयांचा निधी ८ सप्टेंबर रोजी कुटुंबाकडे सुपूर्द केला. यामुळे बालवयात पितृछत्र हरवलेल्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणाचा खर्च तर मिटेलच, पण कुटुंबालाही आधार मिळाला. या निमित्ताने खाकी वर्दीच्या माणुसकीचे दर्शन घडले.

कचारवाडी (ता. बीड) येथील सुदाम भागवत वनवे (३६) हे सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आले. २०१० मध्ये झालेल्या पोलीस भरतीत त्यांची निवड झाली. दरम्यान, एप्रिल २०१९ पासून ते महामार्ग विभागाच्या मांजरसुंबा केंद्रावर प्रतिनियुक्तीवर होते. ११ मे २०२१ रोजी ते मांजरसुंब्याजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी वाहनांची तपासणी करताना भरधाव जीपने (एमएच २८ बीबी-२५२९) त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. बीडमध्ये प्रथमोपचार करून औरंगाबादला नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या जाण्याने आई- वडील, पत्नी आणि ९ व ४ वर्षीय दोन मुले यांचा आधार हरवला. या घटनेने सहकारी अधिकारी व अंमलदारांनाही मोठा धक्का बसला. सुदाम वनवे तर गेले पण त्यांच्या मुलांचे भवितव्य सुकर व्हावे, यासाठी मदत उभी केली पाहिजे, अशी कल्पना महामार्ग विभागाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पुढे आली. अपर महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी या कल्पनेला प्रोत्साहन दिले. सर्वांनी अधिकाधिक मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन उपाध्याय यांनीही केले. त्यानंतर महामार्ग विभागाच्या राज्यभरातील अधिकारी व अंमलदारांनी सुदाम वनवे यांच्या कुटुंबीयासाठी मोठ्या मनाने मदतीकरीता हात सैल केला व पाहता पाहता १३ लाख १६ हजार रुपये इतकी रक्कम गोळा झाली. ८ सप्टेंबर रोजी अपर महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीच्या रकमेचा धनादेश बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या हस्ते कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी महामार्ग विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, मांजरसुंबा केंद्राचे सहायक निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, उपनिरीक्षक यशवंत घोडके उपस्थित होते. याप्रसंगी भूषणकुमार उपाध्याय यांनी वनवे कुटुंबीयाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सर्वतोपरी सहकार्याची भूमिका राहील, असे सांगून धीर देण्याचा प्रयत्न केला.

.....

गहिवरले वनवे कुटुंबीय

सुदाम वनवे यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सैरभैर झालेल्या या कुटुंबासाठी खाकी वर्दीतील सहकाऱ्यांनी मदतीचा हात दिल्याने काहीसा आधार मिळाला आहे. धनादेश स्वीकारताना सुदाम वनवे यांचे वडील व पत्नी यांना गहिवरून आले. ‘दु:ख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना...’ या ओळींचा यानिमित्ताने प्रत्यय आला.

.....

080921\08bed_15_08092021_14.jpg

मदत

Web Title: Two tears of sorrow for a man ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.