२४ दुचाकींसह दोन चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:53+5:302021-08-23T04:35:53+5:30
परळी : दुचाकींची चोरी करून स्वस्तात विक्री करणाऱ्या दाेघांना पोलिसांनी जेरबंद केले. सिरसाळा (ता. परळी) येथे २१ ऑगस्ट रोजी ...
परळी : दुचाकींची चोरी करून स्वस्तात विक्री करणाऱ्या दाेघांना पोलिसांनी जेरबंद केले. सिरसाळा (ता. परळी) येथे २१ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल २४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
सय्यद अमीर सय्यद नोमान (३०, रा. पेठ मोहल्ला, परळी) व अशाेक रमेश गायकवाड (२०, रा. सिरसाळा) अशी आरोपींची नावे आहेत. सय्यद नोमान हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी अशाेक गायकवाड याने गाठलेल्या ग्राहकाकडे सिरसाळा येथे २१ ऑगस्ट रोजी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सिरसाळा ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी सापळा लावला. यावेळी दोघांना चोरीच्या दुचाकीसह रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून औरंगपूर येथून चोरीला गेलेली बापूसाहेब झोडगे (रा.सुकळी ता.धारूर) यांची दुचाकी (एमएच ४४ पी ४९७६) हस्तगत केली. त्या दोघांना खाक्या दाखविल्यावर त्यांनी आणखी २३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे, उपनिरीक्षक एम. जे. विघ्ने, पोहेकॉ ए. आर. मिसाळ, पो. ना. अंकुश मेंढके, जेटेवाड, अर्शद सय्यद, अक्षय देशमुख यांनी ही कारवाई केली. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी त्यांना परळी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
....
तीन जिल्ह्यांत गुन्हे
पकडलेल्या दोन्ही आरोपींपैकी सय्यद अमीर मोमीन याच्यावर पूर्वीचा चोरीचा एक गुन्हा नोंद आहे. अशोक गायकवाड पहिल्यांदाच पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. बीडसह परभणी जिल्ह्यातील पाथरी, सेलू ,गंगाखेड व लातूर उदगीर येथून त्यांनी दुचाकी चोरून आणल्या होत्या. परळीत दुचाकीचोरी करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होतील, असे सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी सांगितले.
220821\22bed_9_22082021_14.jpg
चोरीच्या २४ दुचाकींसह चोरटे