दिवसा घरफोडी करणारे दोघे चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:07 AM2019-04-12T00:07:34+5:302019-04-12T00:08:30+5:30
केज शहरात भरदिवसा घरफोडी करुन किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले.
बीड : केज शहरात भरदिवसा घरफोडी करुन किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले. बीड दरोडा प्रतिबंधक पथकाने कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शिवाजी चौकात सोमवारी ही कारवाई केली. दरम्यान, याच चोरांनी केज व अंबाजोगाई हद्दीत अन्य तीन गुन्हे केल्याचीही कबुली दिली आहे.
सत्तार बाबामियाँ सय्यद (४५) व जावेद उस्मान शेख (३२ दोघे रा. लालबहादूर शास्त्री नगर, लातूर) अशी चोरट्यांची नावे आहेत. १ एप्रिल रोजी केज शहरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड दरोडा प्रतिबंधक पथक तपासाला लागले.
लातूर व परळीतील गुन्हेगारांनी ही घरफोडी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने परळी व लातूरमध्ये सापळा रचला. परंतु चोरटे हाती लागले नाहीत. त्यानंतर सोमवारी पथक थेट कळंब शहरातील शिवाजी चौकात धडकले. तिथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनाही ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. मात्र दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय इतर तीन गुन्हे केल्याचेही मान्य केले. पकडलेले दोन्ही चोरटे अट्टल गुन्हेगार आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, केजचे सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्यासह पथकातील कर्मचारी बबन राठोड, महेश भागवत, दिलीप गित्ते, चालक नारायण साबळे यांनी केली. दरम्यान, दोघांनाही पुढील तपासकामी केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.