दोन हजार पालकांनी पुस्तके केली परत, आपण कधी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:41+5:302021-05-12T04:34:41+5:30
बीड : पर्यावरण संरक्षणासाठी समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्याचा ...
बीड : पर्यावरण संरक्षणासाठी समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तो आता अमलात आणला जात असून पालकांचाही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पालकांमार्फत शाळेत मुख्याध्यापकांकडे जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे शाळा भरली नाही. मुलांनी पाठ्यपुस्तके हाताळलीदेखील नाहीत. काहींनी तर उघडलीच नाहीत. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरले नाहीत, तर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग कसे तरी दोन महिनेच भरले. या विद्यार्थ्यांकडे वाटप केलेली पुस्तके मागील वर्गातून पुढच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने कोणावरही सक्ती न करता पालक आणि विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत इच्छुकांकडून पुस्तके जमा करावीत, तसेच किती संच जमा होतील याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार पालकांनी पुस्तके जमा केल्याचे सांगण्यात येत आहे, तर काही पालक कोविड परिस्थिती सामान्य झाल्यानंतर संबंधित शाळेत आपल्या मुलांना मागीलवर्षी मिळालेली पुस्तके जमा करणार आहेत.
सोशल मीडियाचा आधार घेणार
शालेय पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरासाठी ही पुस्तके जमा करण्यात येत आहेत. यासाठी व्हाॅट्स ॲप, फेसबुक, ई- मेल, प्रसारमाध्यमांचा उपयोग करून जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणाचा संदेश पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने बीड जि. प. शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.
-----
कागदासाठी झाडे तोडावी लागतात. पुस्तके परत परत वापरली, तर ते चांगलेच आहे. आमच्या लहानपणी मोठ्या भावाची पुस्तके आम्ही वापरत होतो. आमची पुस्तके लहान भाऊ, बहीण वापरायचे. पुस्तके एका वर्षात खराब होत नाहीत. पुस्तके सुव्यवस्थित ठेवण्याची मुलांना सवय लागेल. कागदाची बचत होईल, पर्यायाने पर्यावरण संरक्षण व आर्थिक बचत होईल. पालकांनी शालेय पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी प्रतिसाद द्यावा.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.) बीड.
------------
पुस्तकांचा पुनर्वापर व्हायलाच पाहिजे. गरजूंना ती मिळतील. शक्यतो पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांकडून पुस्तके हाताळणी नीट होत नसते. ती गहाळही होतात. माझी मुलगी चौथी उत्तीर्ण झाली आहे. ती पाचवीच्या वर्गात गेली. शासनाच्या आवाहनानुसार तिची पुस्तके मी जबाबदार पालक या नात्याने शाळेत जमा करणार आहे.
- रामप्रसाद शेंडगे, पालक, बीड.
-------
पुस्तके पुन्हा वापराची योजना चांगली आहे. आपण लहानपणी तसेच करत होतो. कागद निर्मितीसाठी झाडांची कत्तल थांबली पाहिजे. माझा मुलगा सहावीत होता. तो सातवीत गेला आहे. गतवर्षी त्याला पुस्तके मिळाली होती. शिक्षण विभाग, शाळेच्या आवाहनानुसार आणि दिल्या जाणाऱ्या वेळेत पुस्तके जमा करणार आहे.
- जालिंदर कागदे, पालक, बीड.
---------
८० हजार पुस्तकांचे नियोजन
पुस्तके पुनर्वापरासाठी बीड जिल्ह्यात ८० ते ९० हजार पुस्तकांचे संकलनासाठी नियोजन करण्यात आले आहे. अनेक पालक शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देतात, त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तके जमा होऊन ती पुढच्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांना कामी येतील.
--------
मागील वर्षी मोफत पाठ्यपुस्तके मिळालेले विद्यार्थी : ३,६१,९६८
वाटप केलेली पुस्तके : २२०००००
यावर्षी मोफत पाठ्यपुस्तके लागणारे विद्यार्थी : ३,४१,८८७
पुस्तक पुनर्वापर योजनेतून जमा होणारी पुस्तके : ८६,०००
मागणी करावी लागणारी पुस्तके : २१,२०,०००
---