बीडमध्ये दोन दुचाकीचोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:11+5:302021-08-29T04:32:11+5:30
बीड : दुचाकी चोरी करून पोबारा करणाऱ्या दोन आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी ...
बीड : दुचाकी चोरी करून पोबारा करणाऱ्या दोन आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी शहरातील सम्राट चौक परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
संभाजी किसन घाडगे (२३, रा. गौरवाडी, ता. केज), नीलेश सुरेश सटले (२१, रा. बरंगळवाडी, ता. शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची पथके सतर्क झालेली आहेत. संभाजी घाडगे हा दुचाकी चोरी करून नीलेश सटलेमार्फत विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या दोघांना शहरातील सम्राट चौक परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले; पण खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाख किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. शहर व शिवाजीनगर ठाणे हद्दीतून त्यांनी प्रत्येकी एका दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. इतर दोन दुचाकींबाबत चौकशी सुरू आहे. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस नाईक जालिंदर बनसोडे तपास करीत आहेत.
...
पुण्यात धुमाकूळ
संभाजी घाडगे हा पुण्यात कंपनीत कामासाठी गेला होता. मात्र, तेथे त्याने दुचाकीचाेरीचे गुन्हे सुरू केले. त्याच्यावर पुणे व परिसरात दहा गुन्हे नोंद आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी तो बीडला आला. काही दिवस त्याने खासगी दवाखान्यात वॉर्डबॉय म्हणूनही काम केले. तो अट्टल दुचाकीचोर असून बीडमध्ये पहिल्यांदाच पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
...
...