दोन महिन्यांत १० बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:46 PM2019-08-11T23:46:05+5:302019-08-11T23:46:34+5:30
भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.
अंबाजोगाई: भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यात दहा जणांचे बळी गेले, तर अनेक जण जखमी झाले. अंबाजोगाई - लातूर नवीन रस्त्याच्या उद्घाटनापूर्वीच अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई ते लातूर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. केंद्र शासनाने भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने बीड जिल्ह्यात ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याची कामे सुरू केली. औरंगाबाद ते लातूर या रस्त्याची मोठी रहदारी याच रस्त्यावर दिसून येते.
सदरील रस्त्याचे काम सुरू आहे. रेणापूर ते बर्दापूर या अंतरावर हा रस्ता चौपदरी झाला. मात्र, बर्दापूरपासून पुढे अंबाजोगाई साखर कारखान्यापर्यंत हा रस्ता पुढे दोन पदरीच ठेवण्यात आला. मोठा झालेला रस्ता अचानकच निमूळता व लहान झाला. त्यात या रस्त्यावर दुभाजकही बसविले नाहीत.
चार पदरी रस्त्याची वाहतूक दोन पदरी रस्त्यावर येऊन ठेपली. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर रस्ता लहान झाल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली.
शनिवारी रात्री झालेल्या तिहेरी अपघतात तिघांचा मृत्यू झाला. या रस्त्याने येणाऱ्या प्राध्यापकाला वाहनाने चिरडले. रस्ता ओलांडणा-या महिलेचा मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे वºहाड घेऊन येणारा टेम्पो मातीचा ढिगारा चुकवतांना समोरच्या वाहनावर धडकला.
या अपघातात दोघे ठार तर १० जण गंभीर जखमी झाले होते. उभ्या वाहनांवर जीप आदळल्याने सेलू येथील दोघे गंभीर जखमी झाले होते. तर शनिवारी रात्री याच रस्त्यावर झालेल्या अपघातात तीन जणांचे बळी गेले. चार जखमींवर उपचार सुरु आहेत. गेल्या महिनाभरात लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.
नवीन झालेला हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच धोकादायक ठरू लागला आहे. वाहनचालकांत या रस्त्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौपदरीकरण करा, अन्यथा आंदोलन...!
बर्दापूर फाटा ते अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करावे ही मागणी सातत्याने प्रशासकीय पातळीवर मांडण्यात आली.
याबाबतचा पाठपुरावा रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडेही करण्यात आला. तरीही शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करत नाही.
रस्ता लहान झाल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी चौपदरीकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिला आहे.
या रस्त्यावर वाढलेली वाहतूक लक्षात घेता रुंदीकरणासाठी तत्काळ निर्णय अपेक्षित आहे.