वनपालाला धक्काबुक्की, माजी उपनगराध्यक्षासह दोघांना दोन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 05:37 PM2021-12-21T17:37:34+5:302021-12-21T17:39:58+5:30
सरकार पक्षातर्फे सहा तर बचाव पक्षाकडून दोन साक्षीदार तपासण्यात आले.
बीड : येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या गाळ्याची भिंत तोडून वनपालास धक्काबुक्की केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष व काकू- नाना आघाडीचे पालिकेतील विद्यमान गटनेते फारुक अली सय्यद मसरत अली ऊर्फ फारुक पटेल व जाकीरुद्दीन युसूफुद्दीन सिद्दीकी(दोघे रा.शहेंशाहनगर, बीड) यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी २० डिसेंबर रोजी हा निकाल दिला.
शहरातील खासबाग परिसरात विभागीय वनाधिकारी कार्यालयाची इमारत आहे. मुख्य रस्त्यावर कार्यालयाने गाळे बांधलेले आहेत. दरम्यान, ही जागा वनविभागाच्या मालकीची असतानाही २२ जुलै २०१५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता गाळ्याचे कुलूप तोडून मागील बाजूची भिंत तोडण्यात आली. यावेळी तत्कालीन विभागीय वनाधिकारी आर.आर.काळे यांनी वनपाल सखाराम प्रल्हाद कदम यांना भिंत तोडणाऱ्यांना रोखण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार कदम हे तेथे गेले, त्यांना समजावत असताना तेेथे माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल आले. त्यांनी ‘तुम दिवार तोडना जारी रखो, वह कौन कदम है..?' असे म्हणत अंगावर धावून आले. यावेळी त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. चिथावणीमुळे भिंत तोडून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, वनपाल सखाराम कदम यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सय्यद फारुक पटेल व जाकीरुद्दीन युसूफुद्दीन सिद्दीकी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. हवालदार अशाेक सोनवणे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीपुरावे व त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्या. हेमंत महाजन यांनी दोघांनाही दोषी ठरवले. कलम ३३२ प्रमाणे दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, कलम ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे एक वर्षे कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. ॲड. अजय तांदळे यांना ॲड.पी.एन.मस्कर यांनी सहाय्य केले.
सहा साक्षीदार तपासले
सरकार पक्षातर्फे सहा तर बचाव पक्षाकडून दोन साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, तपास अधिकारी, पंच साक्षीदार यांचे जबाब व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने त्या दोघांना शिक्षा ठोठावली.