बीड वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास मुजोर दुचाकीस्वाराची भररस्त्यावर धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:51 PM2018-10-01T17:51:29+5:302018-10-01T17:52:34+5:30
रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
बीड : रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार रविवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील भाजीमंडईत घडला. वाहनचालकाविरोधात बीड शहर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला, मुलींवर कारवाई करण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मागील वर्षीपासून वाहतूक शाखेत महिला कर्मचाऱ्यांची भरती केली. या महिलांचे कामही चांगले आहे. परंतमु काही मुजोर वाहनचालकांकडून त्यांना धक्काबुक्की आणि भररस्त्यात शिवीगाळ होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी भाजी मंडई परिसरात एक महिला कर्मचारी वाहतूक सुरळीत करत होत्या. याचवेळी एमएच २३-५०५८ ही दुचाकी त्यांना रस्त्यावर उभा दिसली. त्यांनी दुचाकी कोणाची आहे, अशी विचारणा केली, परंतु पुढे कोणीच आले नाही. शेवटी स्वत: दुचाकी बाजूला करत असताना सय्यद फैजानअली सय्यद तारेकअली हा तेथे आला. माझी दुचाकी कशाला काढता असे म्हणत त्याने हुज्जत घातली.
हा सर्व प्रकार बॉडीआॅन कॅमेऱ्यात कैद करीत असताना सय्यदने हा कॅमेरा हिसकावून घेत फेकून दिला. तसेच त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सदरील महिलेने हा प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर येथे मोठा जमाव जमला. सय्यदला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरोधात शासकीय कामात अडथळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.
बीडमध्ये पोलिसच असुरक्षित?
यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की झाली होती. यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा चक्क महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर आणि वर्दळीच्या ठिकाणी शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. वारंवारच्या या घटनांवरून पोलिसच असुरक्षित असल्याची चर्चा होत आहे.