जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:44+5:302021-04-13T04:31:44+5:30
बीड : जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. एकाच दिवशी बीड शहरातून ४ दुचाकी लंपास केल्याचे उघडकीस ...
बीड : जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. एकाच दिवशी बीड शहरातून ४ दुचाकी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका रुग्णालयासमोर सय्यद मुज्जफर सय्यद यांनी दुचाकी (क्र.एमएच २३ क्यू १५३८) उभी केली होती. ती चोरट्याने लंपास केली. ही घटना ९ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी १० एप्रिल रोजी सय्यद यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह नैराळे हे करत आहेत. दुसरी घटना शासकीय रुग्णालय परिसरात घडली. याठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये संतोष शिवाजी जगताप (रा. मुर्शदपूर, ता.बीड) यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली, ही घटना १ एप्रिल रोजी घडली. दुचाकीचा शोध घेतला परंतु मिळून न आल्यामुळे जगताप यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना तांबारे करत आहेत.
तिसरी घटना शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून, एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये रंजित रवींद्र जव्हेरी (रा. भूम, जि उस्मानाबाद) यांनी त्यांची दुचाकी (क्र.एमएच २५ एई १६४८) उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ८ एप्रिल रोजी दुचाकी लंपास केली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथी दुचाकी चोरीची घटना पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील तेलगाव नाका परिसरात घडली. याठिकाणी शेख इम्रान शेख यांनी त्यांची दुचाकी तेलगाव नाका परिसरातून चोरून नेली. ही घटना ८ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी १० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह जाधव हे करत आहेत. दरम्यान, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
१५ दुचाकींसह ताब्यात घेतला चोर
९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ दुचाकी चोरणारा चोर बीड शहरातून मुद्देमालासह ताब्यात घेतला. दरम्यान, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४ दुचाकी चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चोर पोलीस प्रशासनास आव्हान देत चोऱ्या करत असल्याचे चित्र आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.