भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 08:04 PM2020-12-04T20:04:25+5:302020-12-04T20:04:43+5:30
तेलगाव, दिंद्रुड परिसरात अपघाताची मालिका सुरूच
दिंद्रुड : दिंद्रुड परिसरात गेल्या कांही दिवसांपासुन दुचाकी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सचिन आनंद भोळे ( रा. पांढरी विठ्ठल मंदिरजवळ, नांदेड) असे मृताचे नाव आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान सचिन भोळे हे दुचाकीवरून (एमपी ४१ एम एल १८६८ ) परळीहून औरंगाबादकडे जात होते. यावेळी दिंद्रुडजवळ भरधाव वेगातील एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात सचिनच्या डोक्यास जबर मार लागला. दुखापत गंभीर असल्याने सचिन याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भिषण होता की, सचिन यांनी घातलेल्या हेल्मेटचे तुकडे झाले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी बेलोरा फाट्यावर एका दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे दिंद्रुड परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे .