गर्भलिंगनिदान केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:32 PM2020-01-08T18:32:34+5:302020-01-08T18:35:55+5:30
२०११ मध्ये दिल्लीच्या समितीने केली होती ढाकणे यांच्या हॉस्पिटलची तपासणी
बीड : गर्भातील बाळाचे लिंगनिदान करणे तसेच केलेल्या सोनोग्राफीचे रेकॉर्ड कायद्याप्रमाणे ठेवले नसल्याचा आरोप सिद्ध झाल्याने येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र नारायणराव ढाकणे यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्या न्यायालयाने सुनावली.
शहरातील सुभाष रोडवर ढाकणे हॉस्पिटल असून तेथील सोनोग्राफी सेंटरला दिल्ली येथील राष्ट्रीय पर्यवेक्षण व मूल्यमापन समितीने ११ आॅक्टोबर २०११ रोजी रोजी भेट दिली होती. समितीच्या पाहणीत त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना या सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या सोनोग्राफी सेंटरला भेट दिली असता, काही गरोदर महिलांची सोनोग्राफी केलेले निदर्शनास आले. परंतु, या तपासणीसाठी बंधनकारक अटींची पूर्तता केलेली दिसली नाही. तसेच एका गरोदर महिलेचे सांकेतिक भाषेचे १६ असे गर्भलिंगनिदान केल्याचे पेपर मिळून आले. यावेळी संबंधित महिलेच्या सोनोग्राफीची कागदपत्रे शल्यचिकित्सकांनी मागितली असता, ती देण्यात आली नाहीत.
जिल्हा शल्यचिकित्सक फिर्यादी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी २० डिसेंबर २०११ रोजी बीड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात डॉ. गौरी राठोड आणि किशोर बिरलिंगे हे दोन साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. राठोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने डॉ. राजेंद्र ढाकणे यांना दोषी धरुन दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस. बी. कदम यांनी काम पाहिले. संबंधित दोषीविरुद्ध पुढील कारवाईसाठी शल्यचिकित्सकांना राज्य वैद्यकीय परिषदेकडे अहवाल पाठविण्यासाठी सदर निकालाची प्रत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.