शाळेतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 07:40 PM2021-11-27T19:40:28+5:302021-11-27T19:44:08+5:30
पीडितेसह इतर सहा जणांची साक्ष महत्त्वाची ठरली.
बीड : जिल्हा परिषद शाळेतून घराकडे निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एच.एस.महाजन यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा २६ नोव्हेंबर रोजी सुनावली. शिरुर तालुक्यात दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
शिरुर तालुक्यातील एका गावात २० सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून घराकडे जात होती. यावेळी आप्पासाहेब ऊर्फ बंडू सखाराम शिंदे (२०) याने तिची छेड काढत हातवारे करून विनयभंग केला होता. पीडितेने घरी जाऊन घडला प्रकार सांगितला. त्यानंतर शिरुर ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन उपअधीक्षक मंदार नाईक यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एच.एस.महाजन यांच्यासमोर खटला चालला. न्यायालयासमोर आलेले साक्षीपुरावे तसेच सहायक सरकारी वकील अमित हसेगावकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्या.एच.एस. महाजन यांनी आप्पासाहेब शिंदे यास दोषी ठरवले. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे दोन वर्षे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड करण्यात आला. दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ॲड.अमित हसेगावकर यांना पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत इंगळे, रमेश उबाळे, पोहेकॉ शिवाजी चौधरी यांनी साहाय्य केले.
सात साक्षीदार तपासले
सरकार पक्षाच्यावतीने ॲड. हसेगावकरांनी सात साक्षीदार तपासले. पीडितेसह इतर सहा जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीच्या वकिलाने दोन बचावाचे साक्षीदार तपासले. मात्र, न्यायालयाने त्यांची साक्ष ग्राह्य धरली नाही.