टूलकिट प्रकरणातील दोन तरुण जामिनासाठी हायकोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 01:51 PM2021-02-16T13:51:16+5:302021-02-16T13:53:31+5:30
Greta Thunberg toolkit case मुंबईची निकिता जेकब आणि बीडमधील शंतनू मुळूक यांच्यावर संशयाची सुई
मुंबई / बीड / औरंगाबाद : कृषी कायद्याविरोधात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात ‘टूलकिट’ प्रसार करणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याच प्रकरणात दिशा रवी या तरुणीला अटक झाली असून, व्यवसायाने वकील असलेली निकिता जेकब आणि बीडमधील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक हे दोघेही संशयित आहेत. या दोघांवरही दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर निकिता जेकब हिने मुंबई उच्च न्यायालयात तर शंतनू याने औरंगाबाद खंडपीठात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी ‘टूलकिट’ तयार केले. तसेच ते खलिस्तानच्या समर्थकांशी थेट संपर्कात होते. निकिता जेकबने दाखल केलेल्या या याचिकेवरील सुनावणी न्या. प्रकाश नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे होती. जेकबने चार आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. आपल्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा खोटा आहे, असे जेकबने याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.
दरम्यान, शंतनूचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, त्यांना शंतनू सापडला नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सूत्रांकडून समजते. बीडमधील संशयित शंतनूचे जागतिक पातळीवर पर्यावरणासंदर्भात काम आहे. या तरुणासह इतर चार अशा पाच लोकांचा ग्रुप असल्याचे सांगण्यात येते. याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शविला होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.
दिल्ली प्रकरणात बीडमधील एका तरुणावर संशय असल्याने दिल्ली पोलीस आले होते; परंतु सदरील तरुण सापडला नसल्याने ते परत गेले आहेत.
- आर. राजा,पोलीस अधीक्षक, बीड