सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप

By सोमनाथ खताळ | Published: May 18, 2023 11:06 PM2023-05-18T23:06:12+5:302023-05-18T23:06:35+5:30

महाप्रबोधन यात्रेच्या पूर्वसंध्येलाच राडा

Uddhav Thackeray group Female leader Sushma Andhare beaten up claimed by Beed district head | सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप

सुषमा अंधारे यांना मारहाण? ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा, केले गंभीर आरोप

googlenewsNext

बीड : शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा शनिवारी बीडमध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी गेले होते. यावेळी दोन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारी झाली. तसेच जिल्हाप्रमुखांच्या गाडीची काचही फोडण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाप्रमुख जाधव यांनी आपण अंधारे यांना चापटा मारल्याचाही दावा केला आहे. याप्रकाराने खळबळ उडाली आहे.
सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाची बीडमध्ये मोठी सभा होत आहे. या सभेसाठी खा.संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह इतर खासदार, आमदारांची उपस्थिती राहणार आहे. त्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप व अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी संपर्कप्रमुख धोंडू पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभास्थळी पाहणी करत होते. याचवेळी जाधव व वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केली. त्यातील जाधव यांच्या काळ्या रंगाच्या गाडीची काचही फोडली. इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणे सोडविल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.

जाधव म्हणाले, अंधारेंना दोन चापटा लगावल्या

सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचे झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या, अशी प्रतिक्रिया खूद्द जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.

Web Title: Uddhav Thackeray group Female leader Sushma Andhare beaten up claimed by Beed district head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.