शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांच्या संपर्क कार्यालयावर अजूनही उद्धव ठाकरेंचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 01:02 PM2022-09-13T13:02:55+5:302022-09-13T13:03:23+5:30
चर्चेला उधाण : निवड होऊन महिना उलटला तरी बॅनर तेच कायम
बीड : शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संपर्क कार्यालयावर आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे आहेत. खांडे यांनी शिंदे गटात दाखल झाल्यानंतरही जुनेच बॅनर कायम ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
मागील काही महिन्यांत राज्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेत दोन गट पडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदही मिळविले. त्यानंतर राज्यभरात आपल्या गटाचे जाळे तयार केले. बीडमध्येही ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केलेले सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांना जवळ करत दोघांच्याही गळ्यात जिल्हा प्रमुखपदाची माळ टाकली. २८ जुलै २०२२ रोजी दोघांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले. दाेघेही धडाडीने कामाला लागले. शिंदे यांच्यासह सर्वच गट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना घेऊन पुढे जात आहेत. परंतु खांडे यांच्या संपर्क कार्यालयावर आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर कायम आहे. विशेष म्हणजे निवड होऊन महिना उलटला तरी हे बॅनर न बदलल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत कुंडलिक खांडे यांना तीन वेळा संपर्क केला, परंतु त्यांचा फोन बंद होता.
स्वागताच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो
खांडे यांची निवड झाल्यानंतर शहरभर बॅनरचे जाळे पसरले होते. यावर मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो पाहायला मिळाले. आजही अनेक जाहिराती आणि शुभेच्छापर बॅनरमध्ये शिंदे दिसतात. निवड झाल्यानंतर तयार झालेल्या एकाही बॅनरवर ठाकरे यांचा फोटो दिसला नाही.