पंकजा'ताई'विरोधातही उमेदवार देणार उद्धव'दादू'; बीडमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 06:12 PM2018-10-23T18:12:57+5:302018-10-23T18:16:36+5:30
बीड येथे शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख तसेच आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार
बीड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमधील सभेत बोलताना आता बीडमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे म्हटले. आम्ही गोपीनाथरावांसाठी एक एक मतदारसंघ सोडला. पण, आता बीडमध्ये भगव्याचे राज्य आणायचे आहे, असे म्हणत उद्धव यांनी थेट पंकजा मुंडेंनाच आव्हान दिलं आहे. मुंडे अन् ठाकरे कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे बहिणीविरुद्ध उमेदवार देणार नसल्याचे उद्धव यांनी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत म्हटलं होतं. मात्र, यंदा बहिणीविरुद्ध उमेदवार देण्याची तयारी उद्धव यांनी दर्शवल्याचे दिसून येत आहे.
बीड येथे शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख तसेच आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार कुठलाही विषय आली की चर्चा करत बसते, दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय? दुष्काळ जाहीर करायला सरकार विलंब लावत असेल तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाईल असे वाटत नाही. 30 वर्षानंतर देशात आणि राज्यात हिंदू सरकार आले. पण, पदरात काहीच पडले नाही, आणि काही पडेल असेही वाटत नाही. या सरकारने भ्रमनिरास केला, आजपर्यंत सगळ्यांचे अनुभव घेतले, आता शिवसेनेचा अनुभव का घ्यायचा नाही. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.
गोपीनाथरावांसाठी एक एक मतदार संघ आम्ही सोडला, पण आता मला बीड मध्ये सगळ्या जागांवर भगव्याचे राज्य पाहिजे. त्यासाठी, शिवसैनिकांनो घरा घरात जा, दादाशी बोला, ताईशी बोला, असे आवाहनही उद्धव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडमुकीत युती न झाल्यास शिवसेनेकडून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंविरुद्ध उमेदवार देण्यात येईल, असेच उद्धव यांनी सूचवले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून 2014 साली पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेने परळीतून उमेदवार दिला नव्हता. युती तुटली तरी मैत्रीचं नात शिवसेनेनं जपलय. त्यामुळे बहिणीविरुद्ध आम्ही उमेदवार देणार नाही, असे म्हणत शिवसेनेनं ही जागा पंकजा मुंडेसाठी खुली सोडली होती. त्यानंतर, पंकजा मुंडेंनी मोठ्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली होती.