उद्धवजी, ओबीसींच्या दु:खाची जाणीव असल्यास आरक्षणासाठी रस्ता निघतोच: शिवराजसिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 05:28 PM2022-06-03T17:28:18+5:302022-06-03T17:51:37+5:30
ओबीसी आरक्षणावर कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी पुन्हा कोर्टात गेलो.
गोपीनाथ गड ( बीड) : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, असे मी जाहीर केले. यावेळी कोणी माझ्यासोबत आहे की नाही हे न पाहता मी पुन्हा कोर्टात गेलो. संपूर्ण प्रशासन कामाला लावत आवश्यक माहिती जमा केली. चार महिने दिवसरात्र एक करत काम केले. ओबीसींचे आरक्षण मिळाल्यानंतरच दम घेतला. ओबीसींच्या दु:खाची जाणीव असेल तर आरक्षणासाठी नक्कीच रस्ता निघतो, असा टोला उद्धव ठाकरे यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लगावला. ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या गोपीनाथ गड येथील कार्यक्रमात बोलत होते.
चौहान पुढे म्हणाले, आम्ही निवडणुकीची तयारी करत होतो. तेवढ्यात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे कळले. त्याच क्षणी कोणी सोबत असो की नसो ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका होणार नाहीत असे मी जाहीर केले. त्यानंतर कोर्टात गेलो. मागासवर्ग आयोगाला सर्वे करायला सांगितले. एक रात्रभर आयोगासोबत किती टक्के आरक्षण पाहिजे, यावर विचार केला. त्यानंतर दिल्लीला जाऊन मोठे वकील नेमले. त्यांना मी स्वतः ब्रिफिंग दिले. चारमहिने दिवसरात्र एक करत काम केले. तेव्हा 35 टक्के आरक्षण न्यायालयाने दिले. त्यानंतर निवडणुका जाहीर केल्या, असे माहिती मध्यप्रदेशाच्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्याबद्दल चौहान यांनी दिली. हाच धागा पडकून चौहान यांनी महाराष्ट्रातील ओबीसींच्या दु:खाची जाणीव असल्यास नक्कीच आरक्षणासाठी मार्ग निघेल असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुंडे नवा इतिहास रचून गेले
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला गावोगाव नेले. मी थकणार नाही, मी थांबणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, संघर्षाचे नाव गोपीनाथ मुंडे होते. संघर्ष यात्र काढून कॉंग्रेसला सत्तेबाहेर हाकलले. 1995 ला अंडरवर्ल्डला राज्यातून हाकलून लावले. ऊसतोड मजुरांना न्याय दिला. जनतेसाठी जगले. मुंडे नवा इतिहास रचून गेले. त्यांना मी कधी विसरू शकत नाही, अशा भावना चौहान यांनी व्यक्त केल्या.
मुली असाव्या तर अशा
मुलांपेक्षा मुली आईवडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करतात. मुलींचे कर्तृत्व मोठे आहे. हे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही मुलींकडे पाहून सिद्ध होते. मुली असाव्यात तर अशा, असे मुंडे भगिनींचे कौतुक यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी केले.