कृषी विद्यालयाचा रस्ता बनला उकिरडा; हवेत उडणाऱ्या कोंबडीच्या पंखामुळे विद्यार्थी त्रस्त - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:35 AM2021-02-11T04:35:44+5:302021-02-11T04:35:44+5:30
अंबाजोगाई शहर हे स्वच्छ, सुंदर व शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधले जाते. ‘स्वच्छ अंबाजोगाई सुंदर अंबाजोगाई’ म्हणून पारितोषिकाचा बहुमान ...
अंबाजोगाई शहर हे स्वच्छ, सुंदर व शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधले जाते. ‘स्वच्छ अंबाजोगाई सुंदर अंबाजोगाई’ म्हणून पारितोषिकाचा बहुमान नगरपालिकेने अनेक वेळा पटकावला आहे. याच स्वच्छ शहरातील कृषी विद्यालयासमोरचा रस्ता पूर्ण दुर्गंधीयुक्त बनला असून रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेतर्फे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी गल्ली- बोळांची सतत स्वच्छता केली जाते. स्वाराती रुग्णालय परिसरात दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य होते. त्यासाठी अधिष्ठाता सुक्रे यांनी गांभीर्याने दखल घेऊन स्वारातीला घाणीच्या विळख्यातून मुक्त करून रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला; पण नगरपालिकेच्या नजरेआड असणारे शहरात अनेक रस्ते, गल्ली-बोळ दुर्गंधीयुक्त पाहायला मिळत आहेत. शिक्षणाची पंढरी असलेल्या शहरात मोंढा बाजाराच्या पाठीमागील असलेला रस्ता हा पोलीस वसाहत, सा.बां. विभाग कार्यालय ते स्वाराती रुग्णालयाला जाणारा रस्ता कृषी विद्यालयाच्या समोरून जातो. या रस्त्यावर कृषी विद्यालयाचे विद्यार्थी, वसाहतीकडे ये- जा करणारे पोलीस बांधव व रुग्णालयाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने नागरिकांची या रस्त्यावर सततची वर्दळ असते. हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यातून वाट काढत वाहन चालवावे लागते. खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर शहरातील कानाकोपऱ्यात कोंबड्यांच्या कत्तलीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून बॉयलर कोंबड्यांचे पंख, खराब मांस रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे फेकले जात आहे.