स्टेडियम परिसरात अस्वच्छता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:47+5:302021-01-19T04:35:47+5:30
बीड : शहरातील सहयोगनगर भागातील स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्यापारी येथील रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने सर्वत्र घाण ...
बीड : शहरातील सहयोगनगर भागातील स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्यापारी येथील रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने सर्वत्र घाण दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. स्वच्छतेची मागणी आहे.
स्वच्छतागृहाची दुर्दशा, महिला प्रवासी त्रस्त
चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांसाठी असलेले शौचालय बंद असल्यामुळे त्यांचीदेखील कुचंबणा होत आहे. आगारप्रमुखांनी लक्ष देत स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी आहे.
नेकनूर ते नांदूर रस्त्याची दुरवस्था
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर ते केज तालुक्यातील नांदूरघाट या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक दिवसापासून रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दोन्ही गावे मोठ्या बाजारपेठेची असल्यामुळे रहदारी कायम असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
खड्ड्यातून वाहतूक
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवणफाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्येमय रस्त्यावरून वाहने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे. रस्ते दुरुस्तीची मागणी आहे.
नाल्या तुंबल्याने त्रास
बीड : शहरातील शाहूनगर परिसरात नाल्या तुंबलेल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर खड्डे पडलेले असून, याच खड्ड्यात हे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्तीदेखील वाढत आहे.
वीजचोरी वाढली
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी हटेना
बीड : शहरातील भाजीमंडईत वर्दळ वाढली आहे. येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ असते. गेल्या काही दिवसापासून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.