बाजारात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:08+5:302021-02-06T05:04:08+5:30
कर्जमुक्तीपासून वंचित अंबाजोगाई : आधार लिकिंग व तांत्रिक कारणांमुळे तालुक्यात अद्यापही शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. ...
कर्जमुक्तीपासून वंचित
अंबाजोगाई : आधार लिकिंग व तांत्रिक कारणांमुळे तालुक्यात अद्यापही शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्यांची आधार लिकिंग होत नसल्याने शेतकरी वंचित आहेत. याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.
रस्ता दुभाजकातील झाडे बहरली
बीड : शहरातील रस्ता दुभाजकांच्या मध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून, शहरात ती सुशोभित दिसू लागली आहे. या झाडांना नियमित पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने वाढ चांगलीच होत आहे. मात्र कटई करण्याची देखील गरज आहे. यामुळे ही झाडे आणखी बहरून रस्त्याचे सुशोभिकरण वाढणार आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : शहरातील नगर रोड भागात नागरिक बेशिस्त वाहने उभे करीत आहेत. यामुळे रस्ता अरूंद होऊन वाहतूक खोळंबत आहे. विशेषत: या भागात शासकीय कार्यालय असल्याने सतत वाहतूक असते. त्याच दरम्यान कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात. या पार्किंगमुळे रस्ता वाहतुकीस अरूंद होत असून, अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे.
गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास
नेकनूर : नेकनूर हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. मात्र गावातील गटारी तुंबल्यामुळे गावकऱ्यांसह बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गटारी साफ करण्याची नागरिकांकडून वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे, मात्र ग्रामपंचायतकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, स्वच्छता करावी, अशी मागणी आहे.
गस्त वाढवा
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष होत आहे.
वीज तारांचा धोका
माजलगाव : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीज तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. ही कामे पूर्ण करण्याची मागणी आहे.
बोंडअळीमुळे शेतकरी संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले. आता कापूस बहरात आला होता, तर कापसावर बऱ्याच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसावर हे नवीनच संकट आल्याने कापसाच्या उत्पादनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.