पाळत ठेवून करायचे काका-पुतणे घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:33+5:302021-09-21T04:37:33+5:30
कडा : दुचाकीवरून ट्रीपलसीट फिरायचे...सायंकाळी एकाने पाळत ठेवायची, तर दुसऱ्या दोघांनी कडी-कोयंडे तोडून चोऱ्या करायच्या...अशा पद्धतीने गुन्हे करून काका-पुतण्यांनी ...
कडा : दुचाकीवरून ट्रीपलसीट फिरायचे...सायंकाळी एकाने पाळत ठेवायची, तर दुसऱ्या दोघांनी कडी-कोयंडे तोडून चोऱ्या करायच्या...अशा पद्धतीने गुन्हे करून काका-पुतण्यांनी तालुक्यात धुडगूस घातला होता. ४ सप्टेंबर रोजी अटक केलेल्या या दोघांनी आतापर्यंत सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून, ते सध्या कोठडीची हवा खात आहेत. त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.
विनायक मिश्रीलाल चव्हाण, शायद उर्फ हुरमाशा चव्हाण (दोघे रा. पिंपरखेड. ता. आष्टी ) अशी त्या आरोपींची नावे आहेत. धामणगावच्या (ता.आष्टी) ग्रामस्थांच्या सहकार्याने या दोघांना ४ सप्टेंबर रोजी जेरबंद करण्यात अंभोरा पोलिसांना यश आले. चौकशीत सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्हेप्रवासाचा उलगडा केला. सहा घरफोड्यांची कबुली देत पाच तोळे सोने, पन्नास हजार रुपये रोख मुद्देमाल काढून दिला. सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, उपनिरीक्षक रवी देशमाने, पोलीस नाईक कल्याण राठोड, प्रल्हाद देवडे, गंगाधर अंग्रे, हवालदार पोपट मंजुळे यांचा कारवाईत सहभाग होता. धामणगावच्या ग्रामस्थांना लवकरच पोलीस ठाण्याकडून सन्मानित केले जाणार आहे.
.....
अटक टाळण्यासाठी लपवले वय
चुलता, पुतण्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर ८ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी वकिलामार्फत १८ पेक्षा कमी वय असल्याचे आधार कार्ड सादर करून अल्पवयीन असल्याचे भासवून कारवाईच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासी अधिकारी पोलीस नाईक कल्याण राठोड यांनी न्यायालयात विनंती करून आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी मागितली, त्यात ते अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले.
...
भरदिवसा करायचे मुद्देमाल लंपास
सध्या आष्टी तालुक्यात कांदा लागवड जोमाने सुरू आहे. शिवाय इतर शेतीकामांचीही रेलचेल आहे. याचा फायदा घेत हे काका-पुतणे दुचाकीवरून फिरून दिवसाच घरे फोडून मुद्देमाल लंपास करत. कटावणीच्या साहाय्याने कुलूप तोडून सामानाची उचाकापाचक करणाऱ्या या त्रिकुटाचा अखेर धामणगावच्या ग्रामस्थांच्या मदतीने पाेलिसांनी पर्दाफाश केला.