साखरेची अनियंत्रित पातळी, स्टेरॉईडच्या अतिरिक्त वापरामुळेच म्युकरमायसोसिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:09+5:302021-05-21T04:35:09+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टेरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ...
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टेरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले असल्याचे मत स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग विभाग प्रमुख तथा प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. भास्कर खैरे यांनी व्यक्त केले आहे. या आजारावरील औषधी महागडी असून, त्यांच्या किमती सर्वसामान्य माणसाला विकत घेण्यासाठी नियंत्रणाखाली आणाव्यात, अशी मागणीही डॉ. खैरे यांनी केली आहे.
पहिल्या लाटेत करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळले. यात काही रुग्णांना दृष्टीही गमवावी लागली. दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या वाढल्याने केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच नव्हे, तर खासगी रुग्णालयातही तीन ते चार दिवसांतून एक नवीन रुग्ण येत आहे. स्वाराती रुग्णालयात येणाऱ्या अशा रुग्णांची संख्या कमालीची वाढल्याचे त्यांनी सांगितले. 'पहिल्या लाटेच्या वेळी स्टेरॉइडचा वापर उशिरा सुरू झाला. त्यामुळे याचा वापर तुलनेने अधिक काळजीपूर्वक केला गेला; परंतु दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या उपचारामध्ये स्टेरॉइडचा अतिरेक आणि गैरवापर केल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच कमी झालेली रोग प्रतिकारकशक्ती ही बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने इतर औषधांच्या वापराचा अतिरेकही यास कारणीभूत आहे का, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
आजाराची तीव्रता अधिक
म्युकरमायकोसिस आजार कर्करोगापेक्षाही झपाट्याने वाढतो. याची लक्षणे सर्वसामान्य असल्याने याचे निदानही लवकर होत नाही. त्यामुळे उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे रुग्णालयात येईपर्यंत त्यांच्यातील आजाराची तीव्रता खूप वाढलेली असते. सध्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या किमान १० रुग्णांच्या मेंदूपर्यंत ही बुरशी पोहोचली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी एका रुग्णाचा डोळा काढावा लागला आहे. त्यामुळे निदान वेळेत करणे आवश्यक असल्याचे डॉ. भास्कर खैरे म्हणाले.
प्रतिबंधात्मक उपायांवर भर हवा
कोरोना झाल्यानंतर स्टेरॉईड खूप प्रमाणात घेतलेले, अतिदक्षता विभागात उपचार घेतलेले, कृत्रिम श्वसन यंत्रणेवर बराच काळ असलेले आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक आहे. आजारातून बरे झाल्यानंतर दर आठवड्याला नाकाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्यास वेळेत निदान होऊ शकेल. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. रुग्णांनी न घाबरता लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावा. - डॉ. भास्कर खैरे,
नेत्र रोग विभाग प्रमुख,
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय.
औषधांचा खर्च १५ ते २० लाख रुपये
कोरोनाच्या आधी हा आजार वर्षांतून तीन ते चार रुग्णांमध्ये आढळून येत होता. त्यामुळे औषधांची मागणीही तुलनेने कमी होती; परंतु आता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने औषधांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत याचा तुटवडा भासू शकतो. मुळातच ही औषधे खूप महाग आहेत. रुग्णाला ही औषधे जवळपास तीन ते सहा आठवड्यांपर्यंत घ्यावी लागतात. त्यामुळे एका रुग्णाला जवळपास १५ ते २० लाखांपर्यंतच खर्च येतो.