वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा शेतकरी पायतानाने झोडपून काढतील : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 04:26 PM2021-11-27T16:26:41+5:302021-11-27T16:28:06+5:30
Raju Shetty : महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ?
केज ( बीड ) : महावितरणने पूर्वसूचना न देता सक्तीची वीज बील वसुली सुरु केल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. हा अन्याय तात्काळ थांबवून महावितरणने पूर्ववत वीज जोडून द्यावी, अन्यथा शेतकरी पायतांन घेऊन अधिकाऱ्यांना झोडपून काढतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी दिला. ते तालुक्यातील नाव्होली येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करत होते.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान, नाव्होली यांच्या संयुक्त विद्यमाने "शेतकरी संताप मेळाव्याचे" आयोजन शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले होते. माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, रब्बी हंगामात कुठलीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कापले, सक्तीची वीज बील वसुली करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अन्यायाविरुद्ध येथील सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधी तोंडाला कुलूप लावून गप्प का ? गेल्या महिनाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने झालेल्या मराठवाडा -विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या परिषदेमुळे व रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामुळे राज्य सरकारने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट उठविण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे संघटित होऊन थोडा संयम बाळगावा सोयाबीनचे दर आणखीन वाढतील आश्यकतेनुसार सोयाबीनची विक्री करावी असे आवाहन ही शेट्टी यांनी केले. यावेळी मंचावर जेष्ठ नेत्या प्रा.सुशीलाताई मोराळे, जिल्हाध्यक्ष(पक्ष) कुलदीप करपे, गजानन बंगाळे, पूजा मोरे, रवींद्र इंगळे,(संघटना) जिल्हाध्यक्ष अनिल रांजनकर, अशोक गीते, प्रमोद पांचाळ, अशोक साखरे, सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शहा, सी.बी.एस. इनामदार, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस आदींची उपस्थिती होती.
सोमवारी महावितरण कार्यालयावर 'हल्लाबोल मोर्चा'
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध व सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात अंबाजोगाईत महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर सोमवारी ( दि.29 ) सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने "हल्लाबोल"मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून ताकतीने यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी बळीराजा प्रतिष्ठान चे सी.बी.एस.इनामदार, रणजित बिक्कड, अंकुश बिक्कड, कल्याण केदार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे केज शहराध्यक्ष फेरोजभाई पठाण, भागवत पवार, सुग्रीव करपे, नवनाथ काकडे, चंद्रकांत अंबाड,भारत मुळे, बिभीषण इंगळे,विश्वास जाधव आदींनी प्रयत्न केले.