काम मिळेना, मजुरांपुढे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:13+5:302021-05-18T04:34:13+5:30
फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा अंबाजोगाई : सध्या फळविक्रेत्यांना मुभा देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे ग्राहक घराबाहेरच पडत नसल्याचे दिसून ...
फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा
अंबाजोगाई : सध्या फळविक्रेत्यांना मुभा देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे ग्राहक घराबाहेरच पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांना ग्राहकांची मोठी प्रतीक्षा आहे. कोरोनाची भीती असल्याने काही ग्राहक बाहेरची खरेदी करणे टाळत आहेत. फळांसोबतच भाजीपाल्याचीही विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून जाण्याची वेळ आली आहे.
जारची मागणी वाढली
अंबाजोगाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी घरात कूलरचा आधार घेतला आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे थंड पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे. अनेक जार विक्रेते संचारबंदीच्या काळातही शहरातील विविध भागांत सकाळच्या वेळी घरपोच सेवा देत आहेत.
उत्सवांना कोरोनाचा मोठा फटका
अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील सर्व यात्रा, जत्रा, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा असे सर्व गर्दी होणारे कार्यक्रम शासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आले आहेत. मे महिन्यात ग्रामीण भागात गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. तर सर्वच यात्रा या महिन्यात मोठ्या प्रमाणात असतात. अनेकांचे अर्थकारण या यात्रांवरच असते. यात्रा, उत्सव बंद ठेवल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील अर्थकारणावर होणार आहे.
रस्त्यावर मोठ मोठे खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा. अन्यथा त्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मुडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. शहर व परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनाबाधित निघत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींची तपासणी केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच चालल्याने आरोग्य प्रशासनाचे काम वाढले आहे.