बालकांचा खेळ अधुरा राहिला; शेतातील हौदात बुडून तीन बालकांचा करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:26 PM2023-03-21T18:26:54+5:302023-03-21T18:27:44+5:30
मृत तीनही बालके 5 ते 8 वयोगटातील आहेत.
मधुकर सिरसट
केज ( बीड) : शेतातील पाणी साठविण्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पैठण (सा.) शिवारात घडली. स्वराज जयराम चौधरी ( 9 वर्षे ), पार्थ श्रीराम चौधरी ( वय 7 वर्षे ) आणि कानिफनाथ गणेश चौधरी ( वय 7 वर्ष ) अशी मृत बालकांची नावे आहेत. तिन्ही बालके चुलत भावंडे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
केजपासून 15 किमी अंतरावर असलेल्या पैठण (सावळेश्वर ) येथील चुलत्याच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी स्वराज, पार्थ आणि कानिफनाथ या बालकांच्या आई गेल्या होत्या. दुपारचे जेवण केल्यानंतर तीनही बालकांना शेतातील झाडाखाली थांबवून सर्वजण ज्वारी काढण्यात मग्न झाले.
दरम्यान, खेळताखेळता तोल जाऊन एकजण शेतातील 6 फूट खोल हौदातील पाण्यात पडला. हे पाहताच त्याला वाचविण्यासाठी इतर दोघेही पाण्यात उतरले. परंतु पोहता येत नसल्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे,एएसआय डोईफोडे, जमादार म्हेत्रे, व घोरपडे यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने बालकांचे मृतदेह हौदबाहेर काढले. बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आले आहेत.