अनोखे आंदोलन : रस्त्यासाठी चिखलात अंघोळ, स्वत:ला घेतले गाडून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 02:09 PM2020-09-04T14:09:00+5:302020-09-04T14:11:45+5:30
पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने गीतेवाडी येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी याच रस्त्यावरील खड्ड्यात अंघोळ केली, तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले.
बीड : देश स्वतंत्र होऊन एवढी वर्षे उलटली. मात्र, पाटोदा तालुक्यातील गीतेवाडीला जाण्यासाठी रस्ता काही झाला नाही. अनेक वेळा मागणी करूनही पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी बुधवारी याच रस्त्यावरील खड्ड्यात अंघोळ केली तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले.
पाटोदा नगरपंचायतीने विविध कामांवर करोडो रुपये खर्च केले. मात्र, ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या रस्त्याकडे कायम दुर्लक्ष केले. या रस्त्यावरून अगदी पायी चालणेदेखील शक्य होत नाही. आठ दिवसांपूर्वी आपल्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते चांगदेव गिते यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यातील चिखलात बसून अंघोळ करत अनोखे आंदोलन करण्यात आले.