विद्यापीठ अंबाजोगाईत उभारणार 'कौशल्य विकास’ केंद्र; २५ एकर शासकीय जमीन हस्तांतरित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 01:01 PM2022-07-09T13:01:58+5:302022-07-09T13:02:47+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मागणी
अंबाजोगाई -अंबाजोगाई येथे मंजूर करण्यात आलेल्या 'कौशल्य विकास’ केंद्रासाठी २५ एकर शासकीय जमीन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात येऊन ताबा देण्यात आला. विद्यापीठाने सदरील जमिनीचे हस्तांतरण करण्याची मागणी बीड जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या केंद्रासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने अंबाजोगाई येथे कौशल्य विकास केंद्र उभा करण्यास मंजुरी दिली होती. या कौशल्य विकास केंद्रासाठी २५ एकर शासकीय जमीनीची आवश्यकता होती. त्यामुळे विद्यापीठाने जिल्हा प्रशासनाकडे जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अंबाजोगाई लगतच्या काळवटी तांडा येथील २५ एकर जमीन कौशल्य विकास केंद्रासाठी देण्याचे आदेश १७ जून रोजी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काळवटी तांडा येथील नवीन गट क्र. १/अ/५ मधील १० हेक्टर म्हणजेच २५ एकर जमिनीचे हस्तांतरण कौशल्य विकास केंद्रासाठी विद्यापीठाकडे करण्यात येऊन मंगळवारी (०५ जुलै) रीतसर ताबा देण्यात आला. त्यामुळे लवकरच या केंद्राची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या केंद्रातून कौशल्याधारीत व व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाणार असून बीड जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
अंबाजोगाईच्या शैक्षणिक विकासातील मैलाचा दगड
अंबाजोगाई परिसराच्या शैक्षणिक विकासातील ही एक महत्वाची घटना आहे. पुढील काळात हे कौशल्य विकास केद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे व त्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत व व्यवसायाभिमुख दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या केंद्राचा बीड जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना फायदा होईल.
- डॉ. नरेंद्र काळे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य