विना मावेजा वेठबिगारी; मध्यप्रदेशातील 35 मजुरांची एनजीओने पोलिसांच्या मदतीने केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 05:40 PM2020-11-12T17:40:11+5:302020-11-12T17:41:44+5:30
३५ मजुरांसह त्यांची मुले अशा ५६ जणांची सुटका करण्यात आली.
गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील गोंदी येथे कामासाठी आणून वेठबिगारी कराव्या लागणाऱ्या मध्य प्रदेशातील ३५ मजुरांची मुलाबाळांसह सुटका करण्यात आली. मध्यप्रदेशातील एका एनजीओने तेथील पोलिसांसह गेवराई तहसील प्रशासन, पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून मध्यप्रदेशातील ३५ मजुरांना येथील एका मुकादमाने गेवराई तालुक्यातील गोंदी खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आणून त्यांच्याकडून वेठबिगारी करुन घेत होता. या मजुरांना काम सुरू झाल्यानंतर तुमच्या कामाचा मावेजा दिला जाईल म्हणून सांगितले होते, मात्र त्यांना कुठलाही मावेजा न देता वेठबिगारी करुन घेतली जात होती. याबाबत एका मजुराने तक्रार केल्यानंतर मध्यप्रदेशातील एका एनजीओने तेथील पोलिसांना सोबत घेऊन गेवराई गाठली.
गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांना सर्व हकीकत सांगून त्यांना सोबत घेतले व गोंदी गाठून या ३५ मजुरांसह त्यांची मुले अशा ५६ जणांची सुटका करण्यात आली. पोहोचलेल्या महसूल व पोलीस यंत्रणेने घटनास्थळी पंचनामा करुन मजुरांचे जबाब घेतले. त्यानंतर या मजुरांची गेवराई शहरातील कमलाकर देशमुख यांनी त्यांच्या तथास्तू मंगल कार्यालयात राहण्याची सोय केली. तहसील प्रशासनाने जेवणाची सोय केली. तलाठी माणिक पांढरे यांनी देखभाल केली. या मजुरांना मध्यप्रदेशात परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला, त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हे मजूर गुरुवारी स्वगृही परततील अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.