बसस्थानकात अस्वच्छता ; आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:18+5:302021-02-23T04:50:18+5:30
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात ...
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
विजेच्या तारा लोंबकळल्या
गेवराई : तालुक्यातील गढी मार्गावरील विद्युत तारा जमिनीलगत लोंबकळत आहेत. विजेच्या तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली आहेत. दुरुस्तीची मागणी केली जात आहे, तरी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढत आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम सुरू
धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. डागडुजी सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
विनामास्क न फिरण्याचे आवाहन
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
रोहयो कामांना मागणी घटली
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊसलागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. तर ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांनी ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे तसेच इतर मजुरांनी मोठ्या शहराकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.