अवकाळी, गारपिटीने शेतकऱ्यांची थट्टा मांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:23+5:302021-03-26T04:33:23+5:30
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची ...
तलवाडा
: गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.
खरीप अतिवृष्टीने गेल्यानंतर रब्बीवर मदार असलेला शेतकरी रब्बीची पिकेही हातची गेल्याने सुन्न झाला आहे.
२० मार्च रोजी दुपारी प्रचंड गारपीट,पाऊस व वादळवाऱ्यामुळे ऐन काढणीस आलेले हरभरा,गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळली आहेत. तर फळबागांचेही नुकसान झालेले आहे. खरिपाच्या नुकसानीतून सावरण्याआधीच शेतकरी पुन्हा कोलमडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदत मिळणे गरजेचे आहे.
पंचनाम्याचा फार्स नको मदत हवी
गारपीट व प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याची पाहणी स्थानिक सत्ताधारी, विरोधक तसेच लोकप्रतिनिधींनी केली. मात्र अजूनही अधिकृतपणे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत देऊन तत्काळ दिलासा द्यावा. पंचनामे, दौरे या भानगडीत वेळ घालवू नये अशी मागणी होत आहे.
पिकांचे मातेरे, फळांचा सडा
गहू,हरभरा,ज्वारीची माती तर फळझाडांखाली फळांचा सडा
प्रचंड व टपोऱ्या गारा, वेगवान वारे व पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी,गहू ,हरभरा ही पिके मातीत मिसळली आहेत तर फळझाडांच्या खाली फुले,कळ्या व छोट्या फळांचा सडा पडला आहे.
ऑनलाइन चक्रात अडकलाय विमा
खरीप अतिवृष्टीने व रब्बी हंगाम अवकाळी पाऊस व गारपिटीने मातीत गेला. त्यामुळे ऑनलाइन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा देण्याची भूमिका विमा कंपनीने घेतल्याने त्या किचकट प्रक्रियेमुळे साधा मोबाईल वापरणारे तर सोडा पण ॲन्ड्रॉइड मोबाईलवाले अनेक शेतकरी तक्रारीचा पावती नंबर,ओटीपी,जिओ टॅगचे छायाचित्र जोडताना चक्रावत आहेत.
अस्मानी संकट
टरबूज,खरबूज,भाजीपाल्यांचे तर कुत्रे हाल खाईनात. गहू,हरभरा,ज्वारी या पारंपरिक पिकांपेक्षा टरबूज,खरबूज अशा पिकांना अनेकपट खर्च लागतो. जवळपास एकरी लाखाच्या घरात खर्च असतो. तो खर्च करुन उत्पन्न हाती येण्यावेळीच अस्मानी संकटाने दगा दिल्यामुळे या शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहेत.
===Photopath===
250321\25bed_3_25032021_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापुर परिसरांत सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.