अप्रशिक्षित चालकांमुळे अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:25 AM2017-11-22T00:25:34+5:302017-11-22T00:26:34+5:30
अप्रशिक्षित आणि मनविचलित करणा-या चालकांमुळेच अपघात होऊन सर्वसामान्यांचा जीव जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार तपासणी करणारे आटीओ निरीक्षक आणि ट्रॅव्हल्स मालक आहेत, असा सूर उमटत आहे.
बीड : जिल्ह्यात शेकडो खाजगी बस मुंबई, पुणे, कल्याणसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावतात. परंतु या मार्गावर बस चालविणाºया चालकांना प्रशिक्षणच दिले जात नाही. वारंवार त्यांनाच वाहने चालविण्यास सांगितले जात असल्याने त्यांची मानसिकता चिडचिडी होत आहे. यातूनच अपघाताला निमंत्रण मिळते. अशा अप्रशिक्षित आणि मनविचलित करणा-या चालकांमुळेच अपघात होऊन सर्वसामान्यांचा जीव जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार तपासणी करणारे आटीओ निरीक्षक आणि ट्रॅव्हल्स मालक आहेत, असा सूर उमटत आहे.
माजलगावहून पुण्याला निघालेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला सोमवारी रात्री बीड-परळी राज्य रस्त्यावर अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला बसवर ताबा मिळविता आला नाही. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली गेली व पलटी झाली. नुकतीच डुलकी लागलेल्या प्रवाशी यामध्ये दबले गेले. सुदैवाने यामध्ये मोठी जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल्सची तपासणी करून नियमानुसार चालतात की नाही, याची खात्री करण्याचे काम आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकांचे आहे. परंतु ‘निकम्मे’ अधिकारी येथे असल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय मिळत आहे.
कार्यालयात बसूनच कागदोपत्री तपासण्या केल्या जातात. त्यांची हे दुर्लक्षच अशा अपघातांना निमंत्रण देत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स अपघातात चालक जरी मुख्य आरोपी असलाा तरी आरटीओ कार्यालयातील संबंधित वाहन निरीक्षक व ट्रॅव्हल्समालकाला सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. ट्रॅव्हल्स मालकांवर अप्रशिक्षित चालक ठेवल्याप्रकरणी तर निरीक्षकांवर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून कारवाईची मागणी होत आहे.
ट्रॅव्हल्स उलटून एक ठार, १२ जखमी
कुप्पा येथे ट्रॅव्हल्स (एमएच २३ डब्ल्यू. ४१०५) उलटून झालेल्या अपघातात शेषेराव कुलकर्णी (लखनगाव जि.उस्मानाबाद ह.मु.पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश धर्मराज कदम, माऊली रामिकशन शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी नरवटे, वैभव दगडू पांढरे, अविनाश कांबळे, सुभाष डाके, दत्ता लक्ष्मण जवदले, अजित बाबासाहेब सोनपसारे सह चार जण जखमी झाले.
या सर्वांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमी माजलगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत. मृताचे नातेवाईक रत्नाकर कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही हा चालक फरार असून लवकरच त्याला अटक केले जाईल, असे तपास अधिकारी फौजदार पी.एस.सोनवणे यांनी सांगितले.