पाणी योजना दुरुस्तीवर उधळपट्टी, पुतळ्यांचा विषय रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:56 PM2019-09-03T23:56:53+5:302019-09-03T23:59:34+5:30
शहागड, गेवराई, चौसाळा अशी हायड्रेंड योजना सुरु करावी, सुशिक्षित बेरोजगारांना निधी मर्यादा ओलांडून मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषदेच्या जागेत पुतळे उभारणीच्या विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली.
बीड : पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीच्या नावावर होत असलेली उधळपट्टी, बालाघाटावरील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन शहागड, गेवराई, चौसाळा अशी हायड्रेंड योजना सुरु करावी, सुशिक्षित बेरोजगारांना निधी मर्यादा ओलांडून मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषदेच्या जागेत पुतळे उभारणीच्या विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. तर नुतन इमारतीमधील पुतळा उभारणी व फर्निचर व विद्युत व्यवस्थेबाबत ऐनवेळाचा विषय मांडल्यावरुन विरोधी सदस्यांनी निषेध नोंदवत विरोध दर्शविला व सभात्याग केला.
आगामी निवडणूक व आठवडाभरात जारी होणारी आचारसंहिता लक्षात घेत मंगळवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेतील घडामोडीकडे लक्ष लागले होते. पाणी पुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षतेमुळे पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्तीसाठी निधी खर्च करताना सर्व पातळीवर मान्यता घ्यावी, दुरुस्त करण्यात येणाऱ्या योजनेचा प्रकल्प कालावधी लक्षात घ्यावा, एका गावाला कितीवेळा निधी द्यावा, एका योजनेतून काम झाले असेल तर दुसºया योजनेतून काम होऊ नये अशा स्वरुपाच्या सूचना जि. प. सदस्य अशोक लोढा यांनी मांडल्या. त्यावर लक्ष घालण्यात येईल, असे सीईओ अजित कुंभार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महापुरुषांसोबतच जगाला अहिंसा व शांततेचा मंत्र देणारे भगवान महावीर यांचे तैलचित्र असावे, अशी आग्रही भूमिका घेत लोढा यांनी ठराव मांडला. त्यास जि. प. सदस्य भारत काळे, योगिनी थोरात, विजयकांत मुंडे यांनी अनुमोदन दिले.
या सभेत वडवणी आणि गेवराई तालुक्यातील उमापूर येथील सद्यस्थितीत असलेली जागा ग्रामीण रुग्णालयासाठी हस्तांतरण करण्यास सभागृहाने मान्यता दिली. बालाघाट परिसरातील पाणी टंचाईवर पर्याय म्हणून गोदेचे पाणी शहागड येथून गेवराईच्या जलशुद्दीकरण केंद्रात आणावे तेथून पाडळशिंगी, मांजरसुंबा व चौसाळा येथे आणावे, अशी हायड्रेंड योजना हाती घेण्याबाबत अशोक लोढा यांनी विषय मांडला. त्यावर परिस्थिती समजून घेऊन अभ्यासपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याबाबत अध्यक्ष सविता गोल्हार यांनी सूचना दिल्या.
या सभेत हातपंप दुरुस्तीसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्ती तसेच परळी तालुक्यातील एका शाळेतील गायब झालेली निर्गम उतारा पुस्तिका, दिलेल्या निर्गमवरील आक्षेपार्ह नोंदीवर चर्चा झाली.