UPSC Results : २३ व्या वर्षी देशात २२ वा; बीडचा मंदार पहिल्याच प्रयत्नात राज्यात दुसरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:11 PM2020-08-04T17:11:45+5:302020-08-04T17:18:06+5:30
ध्येय, दिशा निश्चित करून अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त
बीड : ध्येय, दिशा निश्चित करून रोजच्या रोज अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त होते, अशा शब्दात युपीएससी परीक्षेत देशात २२ वा आलेल्या मंदार पत्की याने आपल्या यशाचे गमक सांगितले.
बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेल्या मंदार याने पुढे पुणे येथे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या जयंत पत्की यांचा मंदार हा मुलगा. यूपीएससी परीक्षेत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मंदारने हे दैदिप्यमान यश मिळवले. मंदारने राज्यातही दुसरा क्रमांक पटकावला. आई-वडील यांच्यासोबत त्यांने यशाचे श्रेय पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे विवेक कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांना दिले.
स्मार्ट स्टडीवर भर द्या
निश्चितच ही परीक्षा सोपी नाही परंतु, दररोजच्या अभ्यासाचे अतिसुक्ष्म नियोजन केले पाहिजे. मी दररोज दहा ते बारा तास एकाग्र होऊन अभ्यास करत होतो. या दोन वर्षाच्या काळात अनेक क्षण आपले ध्येय डळमळीत करणारे येतात परंतु, मनाचा दृढनिश्चय असेल तर आपणास त्यावर मात करता येते. अभ्यासात स्मार्ट वर्क पाहिजे.
- मंदार पत्की, आयएएस, २२ वी रँक