UPSC Results : 'शंभरी नंबरी' सोनं; दहावीत १०० टक्के मिळवणारा अंबाजोगाईचा वैभव झाला आयएएस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 04:18 PM2020-08-04T16:18:59+5:302020-08-04T16:37:12+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अंबाजोगाईच्या वैभव वाघमारेचे यश
अंबाजोगाई : येथील भूमिपुत्र वैभव विकास वाघमारे याने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), दिल्ली यांच्या वतीने सप्टेंबर-2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशातून 771 वी रँक प्राप्त करत उज्ज्वल यश संपादन केले आहे. दहावीत १०० टक्के पटकावलेल्या वैभवच्या यशाचा आलेख कायम चढाच राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने हे यश कुठलीही खाजगी शिकवणी न लावता मिळवले आहे.
वैभवचे आई-वडील आशा व विकास हे शिक्षक आहेत. तालुक्यातील नांदडी हे वाघमारे यांचे मुळ गाव आहे. वैभवचे आजोबा ईश्वर वाघमारे व आजी भिमाबाई वाघमारे हे दोघेही शेतमजूर होते. स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी वैभवचे वडील विकास वाघमारे यांना शिक्षक केले. विकास वाघमारे हे सध्या लातूर येथील शंभूलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. तर आशाताई वाघमारे (गवळी) या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत.
दहावीत घेतले होते १०० टक्के
वैभवने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मंदिर विभागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. तर माध्यमिक शिक्षण हे देशी केंद्र लातुर येथून पूर्ण केले. दहावीला असताना वैभवने शंभर टक्के गुण प्राप्त केले होते. शाहू महाविद्यालय, लातूर येथे अकरावी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीला असताना वैभवने 87 टक्के गुण घेतले होते.
दुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश
पुणे येथे सी.ओ.ई.पी. महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2018 साली लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली यावेळी त्याला यशाने हुलकावणी दिली. मात्र, सप्टेंबर-2019 साली केवळ दुस-याच प्रयत्नात त्याने हे यश प्राप्त केले. वैभवने देशातून 771 वी रँक प्राप्त केली असून तो आएएएस झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
सेल्फ स्टडी करा
निकाल अपेक्षित होता, पेपर सोपे गेले होते. त्यातच मुलाखतिला सुद्धा आत्मविश्वासाने सामोरे गेलो होते. या संपूर्ण तयारीत आई-वडील यांना खूप बळ दिले. यासोबतच मित्रांच्या भक्कम साथी शिवाय हे यश अशक्य होते. मी तयारी करताना कोणतीही शिकवणी लावली नव्हती. वेळोवेळी ऑनलाईन उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. तयारी करणाऱ्या सर्वाना एकच सांगणे आहे कि, खाजगी शिकवणीच्या मागे न लागता सेल्फ स्टडीवर भर द्या.
- वैभव वाघमारे, आएएस, 771 वी रँक