रस्त्यावर पडलेले असतात वापरलेले मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:37+5:302021-05-13T04:33:37+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरलेले मास्क पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरलेले मास्क पडलेले दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांनाही याचा संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी रस्त्यावर वापरलेले मास्क टाकू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषीकर्ज देण्याची मागणी
अंबाजोगाई : शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी शासनाकडून कृषी कर्ज देण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे कर्ज भरले. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.
नळांना तोट्यांअभावी पाण्याचा अपव्यय
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात जेव्हा पाणीपुरवठा होतो तेव्हा बऱ्याच वेळा पाणी वाया जाते. शहरात आजही अनेकांच्या नळांना तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी नळांना तोट्या बसविण्यात याव्यात असे आवाहन नगर परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
गावे पडली ओस
अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशा स्थितीत ग्रामस्थ शेतात राहू लागले आहेत. परिणामी गावेही ओस पडू लागली आहेत.
ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे
अंबाजोगाई :खरीप हंगाम तोंडावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे पशुधनबाजार बंद आहे. त्यामुळे बैलांची खरेदी व विक्री बंद झाली आहे. परिणामी बैलांद्वारे केली जाणारी मशागतीची कामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरवर ही कामे सुरू आहेत.