वापरलेला मास्क रस्त्यावर; जमा करण्यासाठी पालिका पडतेय कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:58+5:302021-04-14T04:30:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. कापडी मास्क गरम पाण्याने धुवून वाळवून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. कापडी मास्क गरम पाण्याने धुवून वाळवून घालणे आवश्यक आहे, तर वापरा आणि फेका, या मास्कची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. परंतु लोक मास्क खराब झाल्यास तो रस्त्यावर टाकून देत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्यासह इतर मोकाट जनावरांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच हे मास्क व सर्व कचरा जमा करण्यात पालिकाही कमी पडत असल्याचे दिसत आहे.
रुग्णालयातून निघणारा कचरा जमा करण्यासाठी खासगी संस्थेला कंत्राट दिलेले आहे. परंतु शहरातील कचरा पूर्णपणे जमा करण्यात पालिकेला अपयश येत आहे. त्यात ओला व सुका कचरा वेगळा करताना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आगोदरच पालिका कचरा जमा करण्यात कमी पडत आहे, त्यातच नागरिकही गाफील राहत असल्याचे समोर आले आहे. वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी अस्ताव्यस्त फेकला जात आहे. मास्क खराब झाल्यास काय काम? असे म्हणत ते मास्क फेकून देत असल्याचे दिसते. तर पालिकेकडेही स्वतंत्र अशी व्यवस्था नाही. ज्या संस्थेला कंत्राट दिले आहे, त्यांच्याकडे मास्क दिले जात असल्याचा दावा पालिका करते.
पालिका म्हणतेय, मास्क वेगळे केले जातात...
शहरातील कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागांत जर कोठे मास्क अथवा इतर बायोमेडिकलशी संबंधित साहित्य आढळल्यास ते वेगळे केले जाते. ते सर्व एकत्रित करून संबंधित संस्थेकडे सुपूर्द केले जाते. परंतू तरीही काही लोक उघड्यावर मास्क टाकत असल्याचे दिसते. पालिकेच्या म्हणण्यानुसार रोजच्या कचऱ्यात मास्क खूप तुरळक आढळतात. पण तरीही काळजी घेतली जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
काही रुग्णालयेही गाफीलच
बायोमेडिकल वेस्टेज जमा करण्यासाठी पालिकेने एका खासगी संस्थेला कंत्राट दिलेले आहे. खाटा व कचरा यावर त्याचा दर ठरविला जातो. रोज सकाळी कंत्राटदाराची गाडी खाजगी व सरकारी रुग्णालयांतून हा कचरा उचलते आणि त्यांची एका सुरक्षितस्थळी विल्हेवाट लावते.
असे असले तरी काही खासगी रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टेज हे अस्ताव्यस्त टाकले जाते. मेडिकलमधील बाटली, इंजेक्शन, सलाइन, मास्क आदी साहित्य उघड्यावर टाकले जाते. याचा मानवांसह जनावरांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. यावर काळजी घेण्याची गरज आहे.
रुग्णालयांतील बायोमेडिकल वेस्टेज जमा करण्यासाठी एका संस्थेला कंत्राट दिलेले आहे. तसेच कन्टेन्मेंट झोनमधील कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र वाहन आहे. कोविड केअर सेंटरमधील कचराही स्वतंत्र घंटा गाडीने जमा केला जातो. यावेळी सर्व काळजी घेतली जाते. असे असले तरी रोजच्या कचऱ्यात मास्कचा जास्त वापर दिसत नाही. परंतु रस्त्यावर अथवा रुग्णालय परिसरात काही लोक मास्क टाकत असतील तर ते जमा करण्यासह कारवाई केली जाईल. नागरिकांनीही काळजी घ्यावी.
डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी न.प. बीड
===Photopath===
130421\13_2_bed_17_13042021_14.jpg
===Caption===
महिला, तरूणी घरातून बाहेर पडताच कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करतात. बीड शहरातील छायाचित्र.